

Sambhajinagar Gangster police threat
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: कुख्यात गुंड टिप्याला लुटमारीच्या गुन्ह्यात पुंडलिकनगर पोलिसांनी हसूल कारागृहातून ताब्यात घेतले होते. त्याने फरार साथीदार अर्जुन राजू पवारचे ठिकाण सांगितल्याने त्याला घेऊन पोलिस निघाले असता हनुमाननगर चौकात उतरताच टिप्याने राडा केला. भेळगाडीवर डोके आपटून काच फोडली. रस्त्यावर लोळून चालण्यास नकार दिला. मुसंड्या मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना खुन्नस देत बघून घेण्याची धमकी दिली. हा प्रकार शुक्रवारी (दि.१२) घडला. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुंडलिकनगर ठाण्याचे उपनिरीक्षक विनोद भालेराव यांच्या तक्रारीनुसार, सराईत कुख्यात गुंड शेख जावेद ऊर्फ टिप्या मकसूद शेख हा पोलिस कोठडीत होता. त्याने गुन्ह्यातील फरार सहआरोपी अर्जुन पवारचे घर दाखविण्यासाठी भालेराव हे पथकासह वाहनाने टिप्याला घेऊन जात असताना अचानक त्याने गाडी थांबविण्यास सांगितली. हनुमाननगर चौकात थांबताच खाली उतरून त्याने थेट भेळच्या गाडीवर डोके आपटून काचा फोडल्या. तसेच हिसके देत मुसंड्या मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने चालण्यास नकार देत खाली जमिनीवर लोळत होता. तसेच पुंडलिकनगर पोलिसांना तुम्हाला बघून घेतो, अशी धमकी दिली. याप्रकरणी पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी याप्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम २२१ अन्वये तीन अदखलपात्र गुन्हे (एनसी) दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, गुंड टिप्या टोळीमार्फत गंभीर गुन्हे करतो. त्याच्यावर खून, दरोडा, अपहरण, जीवघेणे हल्ले, लूटमार असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
त्याच्यावर मोक्का, एमपीडीए अशा कारवाया करूनही तो सुधारला नाही. जेलमधून सुटल्यानंतर काही दिवसांत त्याने बायपासवर एका व्यापाऱ्याला तलवार लावून लुटले. त्याला हसूल जेलमधून ताब्यात घेतल्यानंतर पोलिस निरीक्षक अशोक भंडारे, एपीआय शिवप्रसाद कहऱ्हाळे, उपनिरीक्षक विनोद भालेराव, कोळेकर, अंमलदार वाघ, विजय लकवाल, निकम, राठोड, देवकर यांनी भारतनगर, गारखेडा भागात गुन्ह्यातील मोपेड जप्त करण्यासाठी घेऊन गेले. तेव्हाही टिप्याच्या बहिणीने पोलिसांसमोर लोकांना दमदाटी शिवीगाळ केली होती. तिच्यावरही एनसी दाखल करण्यात आली होती.