

Obscene activities taking place in Gangakhed under the guise of a cafe.
गंगाखेड, पुढारी वृत्तसेवा : शहरातील मुख्य रस्त्यासह विविध भागांत सुरू असलेल्या कॅफे हाऊस आणि चायनीज हॉटेलच्या नावाखाली गंभीर गैरप्रकार सुरू असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. प्रायव्हसीच्या नावाखाली या ठिकाणी उभारण्यात आलेल्या केबिनमध्ये अश्लील चाळे आणि अंमली पदार्थांचे सेवन होत असून, अशा कॅफेवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी केली आहे.
या संदर्भात गोविंद यादव यांनी शुक्रवारी पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन दिले. शहरातील अनेक कॅफे हाऊसमध्ये ग्राहकांसाठी छोट्या छोट्या केबिन तयार करून त्यांना पडदे लावण्यात आले आहेत. या बंद केबिनमध्ये अश्लील प्रकार घडत असून, यासाठी हॉटेल चालक ग्राहकांकडून अव्वाच्या सव्वा रक्कम उकळत असल्याचे समोर आले आहे.
या केबिनमध्ये केवळ अश्लील चाळेच नव्हे, तर अवैध नशापाणीही चालत असल्याने शहराचे वातावरण बिघडत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. रोडरोमिओंचा सुळसुळाट कॅफे हाऊससोबतच शहरातील शाळा, महाविद्यालये आणि शिकवणी वर्ग परिसरात रोडरोमिओंचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अल्पवयीन मुलींचा पाठलाग करणे, त्यांना धमकावणे आणि ब्लॅकमेल करण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. यामुळे विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण असून, पालकांकडूनही चिंता व्यक्त केली जात आहे.
यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेऊन तातडीने शोधमोहीम राबवावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर !
शैक्षणिक गंगाखेडमधील परिसरात रोडरोमिओंच्या वाढत्या उपद्रवामुळे मुलींना शिक्षणासाठी घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. साध्या वेशात पोलिसांनी गस्त घालून अशा विकृत प्रवृत्तींना आळा घालावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
निवेदनातील मुख्य मागण्या
कॅफे हाऊसमधील अघोषित प्रायव्हसी केबिन तात्काळ बंद कराव्यात. शहरात चिडीमार आणि दामिनी पथक अधिक सक्रिय करावे. सर्व कॅफे हाऊस आणि सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक करावेत. मुलींची छेड काढणाऱ्या रोडरोमिओंचा बंदोबस्त करून त्यांच्यावर कठोर गुन्हे दाखल करावेत.