

Arnav from Sambhaji Nagar was honored with the 'Prime Minister's National Children's Award'.
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : वीर बालदिनाचे औचित्य साधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शुक्रवारी देशातील २० मुलांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने (२०२५) सन्मानित करण्यात आले. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरीसाठी छत्रपती संभाजीनगर येथील अर्णव महर्षीला गौरविण्यात आले.
महिला व बालविकास मंत्रालयातर्फे राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक केंद्रात आयोजित समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सात क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी देशभरातील २० बालकांना २०२५ या वर्षासाठीचे प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान केले. शौर्य, विज्ञान तंत्रज्ञान, कला-संस्कृती, समाजसेवा, क्रीडा आणि पर्यावरण अशा क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल या बालकांना गौरविण्यात आले.
यापैकी दोघांना मरणोत्तर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कारार्थीमध्ये मध्ये ९ मुले आणि ११ मुलींचा समावेश आहे. यावेळी केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री अन्न-पूर्णा देवी, राज्यमंत्री सावित्री ठाकूर आणि मंत्रालयाचे सचिव अनिल मलिक उपस्थित होते. 'राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करून ही बालके भारताच्या अमृत पिढीचे खरे प्रतिनिधी आहेत.
शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि इतर आव्हानांवर मात करून शौर्य, कला-संस्कृती, पर्यावरण, नवाचार, विज्ञान, समाजसेवा व क्रीडा अशा विविध क्षेत्रांत त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. हा पुरस्कार युवा पिढीतील शौर्य, धैर्य आणि संवेद-नशीलतेला प्रोत्साहन देणारा ठरेल, असे त्यांनी सांगितले.
अर्णवचे लकवाग्रस्त रुग्णांसाठी संशोधन
छत्रपती संभाजीनगर येथील १७वर्षीय अर्णव महर्षी यास विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार' प्रदान करण्यात आला. लकवाग्रस्त रुग्णांच्या हातांसाठी - आधारित पुनर्वास उपकरण आणि अॅक्टिव्ह हँड रिस्ट बँड तयार करणाऱ्या अर्णवने स्मार्टफोन किंवा लॅपटॉपच्या मदतीने हे नवोन्मेषी उपकरण विकसित केले आहे.