

Now, a 'Jantar Mantar' right at Kranti Chowk
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : आता प्रत्येक शहरात जंतर मंतर करणार असाच निर्णय झाल्याने क्रांती चौकातच जंतर मंतर करण्यात आले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारने राजीनामा द्यावा, एसआयआर प्रक्रिया रद्द करावी, ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात. या मागण्यांसाठी डाव्या लोकशाही आघाडीच्या वतीने शनिवारी (दि.१०) सकाळी ११ वाजता क्रांती चौक येथे आंदोलन करण्यात आले.
दिल्लीसह देशभरात होत असलेल्या कथित पोलिस दडपशाहीचा आंदोलकांनी निषेध केला. लोकशाहीत विद्यार्थ्यांना, युवकांना आणि नागरिकांना आपली भूमिका मांडण्याचा तसेच आंदोलन करण्याचा अधिकार आहे. याचा आदर केला पाहिजे, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली. आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीकडे जाणाऱ्या नागरिकांच्या प्रवासात अडथळे निर्माण करणे म्हणजे नागरिकांच्या घटनात्मक अधिकारांवर मर्यादा आणण्याचा प्रयत्न असल्याची आरोप आंदोलकांनी केली.
या प्रसंगी खासदार कल्याण काळे, साथी सुभाष लोमटे, कॉ. भगवान भोजने, कॉग्रेसचे जिल्हाअध्यक्ष किरण डोणगावकर, जगन्नाथ काळे, सय्यद अक्रम, कॉ. अभय टाकसाळ, भीमराव बनसोड, चंद्रकांत चव्हाण, लक्ष्मण साकुडकर, अरुण मते, अनंता कराळे, श्रीकांत फोपसे, अड सचिन गंडलेसह इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.