

छत्रपती संभाजीनगर : जुगार खेळण्यासाठी दुकाने फोडणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला त्याच्या साथीदारासह गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या. या जोडगोळीने शहरात दुकाने फोडून अक्षरशः धुमाकूळ घातला होता. निसार अहमद गफार पठाण ऊर्फ सलमान दुल्हन (२८, रा. संजयनगर बायजीपुरा) आणि गणेश शामराव सदावर्ते (३४, रा. राजीव गांधीनगर, रेल्वेस्टेशन) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी मंगळवारी (दि. २६) दिली. या कारवाईत तब्बल ७ गुन्हे उघडकीस आले आहेत.
सलमान ऊर्फ दुल्हन रात्रंदिवस जुगार खेळायचा. मात्र जुगारात पैसे हरल्यानंतर आणि खेळायला पैसे नसले की तो दुकाने फोडण्याचा मार्ग निवडायचा. चोरीच्या पैशातून तो पुन्हा जुगाराच्या अड्ड्यावर जाऊन बसायचा. गुन्हेगारी वर्तुळात त्याचे नाव दुल्हन पडले होते. दरम्यान, दुल्हनकडे अचानक भरपूर पैसा आला असून, तो रात्रंदिवस पत्ते खेळत बसलेला असतो, अशी माहिती गुन्हे शाखेला मिळाली.
या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने २५ मे रोजी पैठणगेट, दलालवाडी परिसरात सापळा रचला आणि दुल्हनला ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्यांची कबुली दिली. साथीदार गणेश सदावर्ते याच्या मदतीने औरंगपुरा येथील पाठक फोटो स्टुडिओ, भाजी मंडीतील बिअर शॉपी व किराणा दुकान, बुढीलाईन व गुलमंडी येथील दुकाने, तसेच टीव्हीसेंटर, सिडको (एन-६) येथील पान टपऱ्या आणि आझाद चौकातील बिअर बार फोडून चोऱ्या केल्याची त्याने कबुली दिली.
या माहितीवरून पथकाने साथीदार सदावर्ते याच्या घरावर छापा मारला. तेथून गुन्ह्यात वापरलेली लोखंडी टॉमी, हातोडी, दोन दुचाकी आणि चोरी केलेला महागड्या कॅमेऱ्यांसह विदेशी दारू व सिगारेटचा ऐवज जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे सिटी चौक (५), जिन्सी (१) आणि सिडको (१) पोलिस ठाण्यांतील एकूण ७ गुन्हे उघडकीस आले आहेत.
ही कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त (गुन्हे) प्रशांत मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, उपनिरीक्षक प्रविण वाघ, योगेश नवसारे, विजय निकम, प्रदीप दंडवते, राजेश यमदळ आदींच्या पथकाने केली.
दुल्हन कुख्यात शटर फोड्या
सलमान ऊर्फ दुल्हन हा कुख्यात शटरफोड्या असून, गतवर्षीही त्याला गुन्हे शाखेने अटक केली होती. तेव्हा त्याने ६ मोबाईल शॉपी फोडल्या होत्या. तर त्याचा साथीदार सदावर्ते हा दारू विक्रेता असून, तो सलमानला दुकान फोडण्यात मदत करतो. बिअर बार फोडल्यानंतर चोरलेली दारू विकण्याचा त्याचाच प्लॅन असायचा.