

कडा : आष्टी शहरासह ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून महिलांच्या गळ्यातील दागिने 'धूम स्टाईल'ने हिसकावून दुचाकीवरून पसार होणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा आष्टी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन सख्ख्या मेहुण्यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या चौकशीतून दोन गंभीर गुन्ह्यांची कबुली मिळाली आहे. या प्रकारामुळे आणखी अनेक चोरीच्या घटनांची उकल होण्याची शक्यता आहे.
आष्टी परिसरात महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये, विशेषतः महिला वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, ३० एप्रिल २०२६ रोजी एक महिला पायी जात असताना, दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पोबारा केला. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (गु.र.नं. १९१/२०२६) करण्यात आला होता. त्याच दिवशी अशाच प्रकारच्या आणखी दोन घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली होती.
घटनेनंतर आष्टी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कसून तपास करत होते. तपासादरम्यान पोलिसांनी २५ हून अधिक गुन्हेगारी वस्त्यांची पडताळणी केली, हिस्ट्रीशीटरची चौकशी केली आणि १०० पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेजची छाननी केली. पोलिसांना उघड आव्हान देणाऱ्या या चोरट्यांचा माग काढण्यासाठी तीन विशेष पथके तैनात करण्यात आली होती.
शनिवारी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून विकास गड्या भोसले (वय २२, रा. चिखली, ता. आष्टी, जि. बीड) आणि अरुण बप्पा काळे (वय २२, रा. बोलेगाव, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) या दोन आरोपींना अटक केली.
पोलीस चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. अरुण काळे हा गंगापूरहून दुचाकीवरून थेट आष्टीत येत असे. येथे आल्यावर तो आपला सख्खा मेहुणा विकास भोसले याला सोबत घेऊन शहरात फिरत एकट्या महिलांना 'टार्गेट' करत असे. संधी मिळताच गळ्यातील सोनसाखळी किंवा दागिने हिसकावून दोघेही पसार होत. चोऱ्यांमागील मुख्य उद्देश मौजमजा आणि दारूच्या व्यसनासाठी लागणारा खर्च भागवणे असल्याचे तपासात समोर आले आहे.
आरोपींनी आष्टी परिसरातील दोन गुन्ह्यांची कबुली दिली आहे. यात आष्टी-रुटी-खानापूर रस्त्यावर महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावणे आणि आष्टी शहरातील आणखी एका महिलेची लूट केल्याचा समावेश आहे. बीड आणि संभाजीनगर जिल्ह्यातील इतर गुन्ह्यांचे धागेदोरेही या तपासातून समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी बाळकृष्ण हनपुडे आणि पोलीस निरीक्षक शरद भुतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कृष्णा शिंदे, LCB चे पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर तसेच संयुक्त पोलीस पथकाने केली.
▪️ अरुण काळे गंगापूरहून थेट आष्टीत येऊन गुन्ह्यांची आखणी करत असे.
▪️ मेहुणा विकास भोसलेला सोबत घेऊन शहरात महिलांवर पाळत ठेवली जात असे.
▪️ दुचाकीवरून वेगात येऊन झडप मारून सोनसाखळी हिसकावून तात्काळ पलायन करणे.
▪️ दारू आणि मौजमजेसाठी चोऱ्या केल्याची कबुली.
▪️ दोन गुन्ह्यांची प्राथमिक कबुली; आणखी अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता.
▪️ सोनसाखळी चोरीच्या घटनांमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण.
▪️ आरोपींचा छडा लावण्यासाठी तीन विशेष पथकांची स्थापना.
▪️ १०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी.
▪️ गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून अटक.
▪️ आष्टी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई यशस्वी.