

Notorious Nishikant Shirke lodged in Kolhapur jail
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : भावसिंगपुरा भागातील कुख्यात गुन्हेगार निशिकांत ऊर्फ बब्बी राजू शिर्के (२५, रा. भीमनगर, भावसिंगपुरा) याचे गुन्हेगारी कृत्य वाढतच चालल्याने शहर पोलिसांनी त्याच्यावर दुसऱ्यांदा एमपीडीएची कारवाई करून त्याला थेट कोल्हापूरच्या कारागृहात गुरुवारी (दि.३०) स्थानबद्ध केल्याची माहिती पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी दिली. निशिकांत हा कुख्यात गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध छावणी, बेगमपुरा पोलिस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
यात शस्त्राने जीवघेणे हल्ले, दंगा, स्त्रियांचा विनयभंग करून हमला करणे, जागेवर अतिक्रमण, हद्दपार आदेशाचे उल्लंघन, गुंडगिरी अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. काही महिन्यांपूर्वीच तो जेलमधून बाहेर येताच त्याने साथीदार रेकॉर्डवरील आरोपींवर जीवघेणा हल्ला केला होता. त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या.
त्यानंतर पोलिस आयुक्तांनी त्याच्या कृत्यामुळे दुसऱ्यांदा एमपीडीएची कारवाई करण्याचे आदेश दिले होते. वाढत्या गुन्हेगारी ही कारवाई पोलिस आयुक्त सुधीर हिरेमठ, उपायुक्त पंकज अतुलकर, रत्नाकर नवले यांच्या मार्गदशर्नाखाली पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, उपनिरीक्षक सचिन गाडेकर, जमादार नारायण पायघन, दीपाली सोनवणे, महादेव दाणे, रवींद्र देशमुख, महाशंख दांडगे, शफिक शेख यांनी केली.