

छत्रपती संभाजीनगर : राजस्थानच्या तरुणाकडून १ लाख ३० हजार उकळून बनावट लग्न केल्यानंतर मनमाडपर्यंत सोबत जाऊन पसार झालेल्या नवरीसह तोतया मावशीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. शन्नो बब्बू शेख (४५, रा. भारतनगर) असे बनावट मावशीचे नाव असून, आदिती जगताप असे नवरीचे नाव आहे. शन्नोची पोलिस कोठडीत तर आदितीची निरीक्षण गृहात रवानगी करण्यात आल्याची माहिती निरीक्षक प्रविणा यादव यांनी दिली. गुन्ह्यात यापूर्वी मुख्य आरोपी नजमा खान हिला पोलिसांनी अटक केली होती.
दिलीपकुमार देवरामजी सेन (३०, रा. पिनवाडा, जिल्हा सिरोई, राजस्थान) हे सलून व्यवसायी आहेत. कोरोनाच्या काळात पत्नीच्या निधनानंतर ते पुनर्विवाहासाठी मुलगी शोधत होते. त्यांच्या भावाने नरेश सेन यांनी संभाजीनगर येथील फिरोज भाई व सलीम भाई यांच्यासह नजमा खानशी संपर्क साधला. नजमा खानने एका तरुणीचे फोटो दाखवून कुटुंबाला शहरात बोलावले. ९ डिसेंबरला कुटुंब शहरात येऊन रेल्वेस्टेशन परिसरातील हॉटेलमध्ये राहिले.
घर पाहणी नंतर लग्न ठरवून मुलीच्या घरच्यांना देण्याची थाप मारून १.३० लाख रुपये घेतले. दुसऱ्या दिवशी बनावट विवाह पार पडला. नंतर नवरी आदिती व मैत्रीण चंदाला राजस्थानला पाठवण्याचा दिखावा करून दोघीजणी मनमाड पर्यंत गेल्या. तेथून हॉटेलमध्ये मुक्कामासाठी थांबताच दोघीनी धूम ठोकली होती. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी नजमा खान हिला पडेगाव परिसरातून अटक केली होती. बुधवारी शन्त्रो आणि आदितीला हर्मूल शेजारील धामणी गावातून अटक करण्यात आली.
आदिती सासर सोडून राहायची माहेरी
आदितीचे वर्षभरापूर्वी लग्न झाले. मात्र सासरच्या छळाला कंटाळून ती माहेरी निघून आली होती. येथेही त्रास सुरु झाल्याने ती माहेरचे घर सोडून सहा महिन्यांपासून शन्नो राहत असलेल्या परिसरात राहण्यासाठी गेली. तेथे दोघींची ओळख झाली. शन्नो आणि अदिती दोघी सोबत कामाला जात होत्या.