

छत्रपती संभाजीनगर: जादा परताव्याचे आमिष दाखवून लिलाव भिशीच्या नावाखाली शहरात एका महिला डॉक्टरची ८ लाख ९० हजार ३४९ रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार २०२० ते २०२४ या काळात गोदावरी चीट फंड प्रा.लि., सागर ट्रेंड सेंटर समोर, पहिला मजला येथील कार्यालयात घडला. या प्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात कंपनीच्या संचालकांसह एकूण नऊ जणांविरुद्ध फसवणूक आणि बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी मंगळवारी (दि.१६) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संचालक विलास गणपतराव सोनुने (५५), सचिन भारत शिंधीकुमाटे (४५), शीला उत्तमराव वानखेडे (५०), शैलेश रविकिरण जगताप (४०), योगेश हरिश्चंद्र घटकार (४५), अमोल वी. साखरे (४५), व्यवस्थापक रविकिरण पद्माकर जगताप (५५), अकाउंटंट विक्की भारुका (३०) आणि सुरेश दिलीपराव सर्जे (३०) अशी आरोपींची नावे आहेत.
फिर्यादी डॉ. ज्योती प्रह्लाद कस्तुरे (४३, रा. सुमती पार्क, गारखेडा परिसर) यांच्या तक्रारीनुसार, गोदावरी चीट फंड कंपनीचे व्यवस्थापक शैलेश आणि रविकिरण जगताप या दोघांनी ओळखीच्या लोकांचा दाखला देऊन संपर्क साधला होता. लिलाव भिशीमध्ये गुंतवणूक केल्यास बाजारभावापेक्षा जास्त परतावा मिळेल आणि ही गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित असल्याचे आश्वासन त्यांना देण्यात आले होते. या आमिषाला बळी पडून डॉ. कस्तुरे यांनी १० लाख आणि २५ लाख रुपयांच्या दोन भिशी गटांत नाव नोंदणी केली.
लिलाव भिशीत डॉ. कस्तुरे यांच्या ओळखीचे काही जण सदस्य असल्याचे त्यांना दाखवले देण्यात आले. डॉ. कस्तुरे यांनी १० लाखांच्या गटात २१ महिने आणि २५ लाखांच्या गटात ३५ महिने नियमित हप्ते भरले. मात्र २५ लाखांची भिशी चालवण्यास कंपनीने असमर्थता दर्शवून पुढील हप्ते भरणा बंद करण्यास सांगितले. मुदत संपल्यानंतर मिळणारी ९ लाख ५१ हजार रुपयांची रक्कम देण्यास कंपनीने टाळाटाळ सुरू केली.
तक्रार केली तर पैसे बुडाले समजा
हिशेबासाठी पाठपुरावा केला असता कंपनीचे सर्वेसर्वा विलास सोनुने हे विचित्र माणूस असल्याचे सांगून कर्मचाऱ्यांनी कायदेशीर कारवाई केली तर आम्ही तुरुंगात जाऊन बसू मात्र तुमचे सर्व पैसे बुडाले असे समजा, अशी धमकी वजा समज देऊन डॉ. कस्तुरे यांना संयम राखण्यास सांगितले.
वस्तू व सेवा कर विभागात दिली बनावट कागदपत्रे
आरोपींनी डॉ. कस्तुरे यांच्या नावाचे बनावट शपथपत्र आणि त्यांच्या खोट्या स्वाक्षरीचे कॅश व्हाऊचर तयार करून ते वस्तू आणि सेवाकर विभागाकडे सादर केले. सर्व रक्कम अदा केली आहे असे भासवून प्रशासनाची आणि फिर्यादीची दिशाभूल करण्यात आली. डॉ. कस्तुरे यांच्याप्रमाणेच संदीप विलास मुळे आणि पुरुष-ोत्तम सोपान तायडे यांच्यासह इतर अनेक लोकांची या कंपनीने फसवणूक केल्याचे तपासात समोर येत आहे.
पोलिस आयुक्तांकडे तक्रार करताच काही रक्कम दिली
कस्तुरे यांनी पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली. त्यानंतर आरोपींनी त्यांच्या खात्यात ७ लाख रुपये पाठवले. कंपनीने काही धनादेश दिले, मात्र त्यातील अडीच लाख रुपयांचा एक धनादेश बँकेत वठला नाही. त्यामुळे डॉ. कस्तुरे यांनी भरलेल्या रकमेवरील व्याज आणि कारवाईसाठीचा खर्च अशी ८.९० लाखांची फसवणूक झाल्याची तक्रार जिन्सी ठाण्यात दिली. अधिक तपास उपनिरीक्षक रविकिरण कदम करत आहेत.