

Notice to CJP workers not to participate in protest; Deepke's displeasure
वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी) १० ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीतील जंतर मंतर येथे मोर्चा आयोजित करत आहे. चंद्रपूर पोलिसांनी या आंदोलनात सहभागी न होण्याबाबत सीजेपीच्या दोन कार्यकर्त्यांना नोटीस बजवाल्याने सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी तीव्र टीका करत नाराजी व्यक्त केली आहे.
सिडको वाळूज महानगरातील त्यांच्या निवासस्थानी मंगळवारी (दि.६) सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी पत्रकार परिषदेत घेतली. यावेळी ते म्हणाले ५ ऑक्टोबर रोजी, चंद्रपूर शहरातील रामनगर आणि बल्लारपूर पोलिसांनी चंद्रपूरचे रहिवासी राम जयकुमार बडोलो आणि बल्लारपूरचे रहिवासी मयूर प्रेमानंद मालखेडे यांना नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये त्यांना जंतर मंतर आंदोलनात सहभागी न होण्यास सांगण्यात आले आहे.
तसेच आंदोलनाला आर्थिक पाठिंबा कोण देत आहे आणि सहभागी होण्याचा उद्देश काय आहे, याचाही उल्लेख आहे. या नोटीसमध्ये परवानगीशिवाय आंदोलनात सहभागी न होणे, सोशल मीडियावर हिंसाचाराला चिथावणी देणाऱ्या पोस्ट शेअर न करणे किंवा प्रक्षोभक भाषणे न करण्याच्या सूचनांचाही समावेश असल्याचे सांगून या नोटीसवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले महाराष्ट्र पोलीस दिल्ली पोलिसांपेक्षा चांगले आहे.
पण केवळ एक-दोन पोलीस अधिकाऱ्यांच्या कृतीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात पोलिसांची बदनामी होत आहे. पोलिसांनी सीजेपी कार्यकर्त्यांना त्रास देऊ नये. त्याऐवजी त्यांनी मला अटक करावी. पण आमच्या कार्यकर्त्यांना विनाकारण त्रास देऊन नका असे ते म्हणाले. दिपके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
महाराष्ट्राला जिजाऊ, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज यांची वैचारिक परंपरा लाभली आह. राजकीय महत्वकांक्षेसाठी पोलिसांचा दुरुपयोग करून महाराष्ट्राला अपमानित करू नका असे त्यांनी सांगितले. मतदार यादीतील बदलांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करून ते म्हणाले निवडणूक आयोगाने फॉर्म-६ मध्ये करण्यात आलेल्या बदलांना सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी नसल्याचा दावा करत हे बदल कोणाच्या आदेशाने करण्यात आले, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.