

Note Municipal Corporation's encroachment squad WhatsApp location share
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेचे अतिक्रमण पथक कारवाईसाठी निघाले की त्याची खबर संबंधितांपर्यंत पोहोचत असल्याचा धक्कादायक प्रकार मिटमिटा परिसरात उघडकीस आला आहे. पथकाच्या वाहनाचा पाठलाग करणाऱ्या संशयित तरुणाचा मोबाइल तपासल्यानंतर अतिक्रमण पथकाच्या हालचालींवर नजर ठेवणारे दोन व्हॉट्सअॅप ग्रुप आढळून आले. या ग्रुपवर पथकाचे लोकेशन, वाहनांची माहिती, अधिकारी-कर्मचाऱ्यांची छायाचित्रे तसेच पथकाच्या पुढील हालचालींची माहिती पाठविली जात होती. या दोन्ही ग्रुपमध्ये तब्बल ९०९ सदस्य असल्याचे समोर आले असून, या प्रकाराची सखोल चौकशी करून सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे.
शहरालगतच्या भागातील अनधिकृत प्लॉटिंगविरोधात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेतंर्गत पथकाकडून सातारा-देवळाई, पडेगाव-मिटमिटा, पहाडसिंगपुरा, हनुमान टेकडी आणि हसूल परिसरात गेल्या तीन आठवड्यांत कारवाया करण्यात आल्या. तसेच महापालिकेची मंजुरी न घेता लेआऊट विकसित करून प्लॉट विक्री करणाऱ्यांवर कारवाई सुरू आली असल्याने संबंधितांकडून विरोध होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.
दरम्यान, पथक मिटमिटा येथे कारवाईसाठी जात असताना पथकाच्या मागे दोन वाहने येत असल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यावरून संशय बळावल्यानंतर एका वाहनातील सुमारे ३० वर्षीय तरुणाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात आली. तसेच त्याच्या स्मार्टफोनची तपासणी केली असता पथकाच्या हालचालींची माहिती प्रसारित करणारे दोन ग्रुप आढळले. यात पथक कोणत्या भागात पोहोचले आहे,
पुढे कोणत्या दिशेने जात आहे, कोणते वाहन वापरले जात आहे, तसेच वाहनात कोणते अधिकारी किंवा कर्मचारी आहेत, याबाबतची माहिती ग्रुपवर टाकली जात होती. यासह छायाचित्रांसोबतच व्हॉइस मेसेजच्या माध्यमातूनही पथकाच्या हालचालींचे अपडेट दिले जात असल्याचे तपासात समोर आले. त्या तरुणाला चौकशीनंतर सोडण्यात आले मात्र त्याचा मोबाईल पुढील तपासासाठी महापालिकेने ताब्यात ठेवला आहे.
मनपातील खबऱ्यांचा शोध
अतिक्रमण पथकाची इत्थंभूत माहिती ग्रुपवर नेमकी कोणाकडून पुरविली जात होती, याचा शोध सुरू आहे. या प्रकारामागे महापालिकेतील अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे का, याचीही पडताळणी केली जात आहे. याची चौकशी पूर्ण झाल्यानंतर संबंधितांविरोधात पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात येणार असल्याचे अतिक्रमण विभागाने स्पष्ट केले आहे.
दोन ग्रुपमध्ये ९०९ जण
एमएच २० लोकेशन ग्रुप्र या नावाच्या ग्रुपमध्ये ८१६, तर हातगाडी एमएच २० लोकेशन ग्रुपमध्ये ९३ सदस्य असल्याचे तपासणीत आढळले. या दोन्ही ग्रुपवर अतिक्रमण पथकाची वाहने, अधिकारी-कर्मचाऱ्यांची छायाचित्रे आणि पथकाच्या ठिकाणाची माहिती प्रसारित केली जात होती. यासह पथक सध्या कुठे आहे, कुठे रवाना झाले आहे आणि कोणत्या मार्गाने जाणार आहे, याची माहितीही व्हॉइस मेसेजद्वारे दिली जात होती.