

No letter of withdrawal from Guardian Minister Shirsat's son
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महिनाभरापूर्वी प्रशासनाने वेदांत हॉटेलच्या लिलावाची प्रक्रिया राबविली. त्यात पालकमंत्री संजय शिरसाट यांचे चिरंजीव सिद्धांत शिरसाट यांच्या कंपनीने सर्वोच्च बोली लावली. मात्र विरोधी पक्षाने लिलाव प्रक्रियेवर आक्षेप घेतल्यानंतर संजय शिरसाट यांनी या प्रक्रियेतून माघार घेतली.
मुलगा सिद्धांत माघारीबाबत उद्याच प्रशासनाला पत्र देईल, असेही जाहीर केले होते. परंतु आतापर्यंत त्यांच्याकडून माघारीचे प्रशासनाला दिले गेलेले नाही. पत्र न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने २० मे रोजी धनदा कॉर्पोरेशन कंपनीच्या मालकीचे हॉटेल वेदांत आणि शेजारील मोकळ्या जागेचा लिलाव केला. उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड यांनी सातव्यांदा ई ऑक्शनची प्रक्रिया राबविली.
लिलावासाठी प्रशासनाने दोन्ही मालमत्तांची किमान आधारभूत किंमत ही ६४ कोटी ५३ लाख रुपये इतकी निश्चित केली होती. सिद्धांत मटेरियल प्रोक्युअरमेंट अॅण्ड सप्लाईज कंपनीने यासाठी ६४ कोटी ८३ लाख रुपये एवढी सर्वोच्च बोली लावली. त्यामुळे ही कंपनी मालमत्ता खरेदीसाठी पात्र ठरली.
प्रशासनाने या कंपनीला बोलीच्या २५ टक्के रक्कम पुढील महिनाभरात आणि उर्वरित रक्कम तीन महिन्यांत जमा करण्याचे आदेश दिले. बोली जिंकणारी कंपनी ही पालकमंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट यांची असल्याने विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि खासदार संजय राऊत यांनी या लिलाव प्रक्रियेवर आक्षेप नोंदविले. ही मालमत्ता प्रत्यक्षात ११० कोटी रुपयांहून अधिक किमतीची असून, प्रशासनाने शिरसाट यांच्यासाठी त्याची किंमत कमी दाखविल्याचा आरोप या नेत्यांनी केला.
या प्रकरणावरून मोठा गदारोळ माजल्यानंतर मंत्री शिरसाट यांनी लगेचच या प्रक्रियेतून मुलगा सिद्धांत माघार घेत असल्याचे जाहीर केले. शिवाय मुलगा उद्याच जिल्हा प्रशासनाला तसे पत्र देईल, असेही सांगितले.
याबाबत उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड यांना विचारणा केली असता, आतापर्यंत सिद्धांत शिरसाट यांच्याकडून तसे पत्र प्रशासनाला प्राप्त झाले नसल्याचे त्यांनी सांगितले.