

chicken shop workers attacked on Three people
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
चिकन शॉपवरील एकाच्या नाकावर ठोसा मारल्यानंतर झालेल्या वादातून शॉपवरील दोघांनी दोन भावांसह त्यांच्या एका मित्रावर सत्तूरने सपासप वार केले. यात एकाचा मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी आहेत. ही थरारक घटना गुरुवारी (दि. १९) रात्री आठ ते साडेआठ वाजेदरम्यान मुकुंदवाडी सिग्नलजवळील कुरेशी पोल्ट्री ट्रेडिंग या दुकानासमोर जालना रोडवर घडली.
नितीन सोनाजी शंकपाल (३५) असे मृताचे नाव तर सचिन सोनाजी शंकपाल आणि दत्ता बालाजी जाधव (तिघेही रा. राजनगर, मुकुंदवाडी) अशी जखमींची नावे असल्याची माहिती एमआयडीसी सिडको ठाण्याचे पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी दिली. चिकन शॉपवर काम करणारा मस्तान कुरेशी ऊर्फ नन्ना आणि समीर शेख अशी आरोपींची नावे असून, दोघांना पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतले आहे. नितीनच्या चेहरा, मान, छातीसह डोक्यात घाव बसल्याने रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. सचिनचीही प्रकृती गंभीर असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन, सचिन आणि दत्ता हे दुकानातून चिकन घेऊन बाजूलाच असलेल्या हॉटेलात जेवण करण्यासाठी गेले होते. जेवण करून ते हॉटेलबाहेर झाडाखाली थांबले होते. तेव्हा तिघांपैकी एक जण कुरेशीच्या दुकानामागे लघुशंकेसाठी गेला. तिथे कुरेशीच्या दुकानातील समीरने लघुशंका करणाऱ्याला शिवीगाळ केली. समीरच्या नाकावर ठोसा मारून मारहाण केली. त्यानंतर लघुशंका करणारा कुरेशीच्या दुकानाबाजूला थांबलेल्या दोन मित्रांकडे आला.
तिथे कुरेशीच्या दुकानातून नन्ना समीरसह तिघांकडे आला. इस को क्यू मारा, असा जाब विचारला. त्यावरून त्या तिघांनी आरोपी नन्ना आणि समीरच्या अंगावर दगड घेऊन धावून गेले. पाच जणांमध्ये हाणामारी झाली. तिघे दगड घेऊन आल्याने आरोपी नन्ना हा धावत चिकन शॉपमध्ये गेला. त्याने सत्तूर घेऊन येत तिघांवर सपासप वार केले. चेहरा, डोके, मानेवर जबर वार झाल्याने नितीन रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडला. सचिन आणि दत्ता जाधव यांच्यावरही वार झाले. हा सर्व प्रकार जालना रोडलगत सुरू होता.
मृत नितीन शंकपाल हा सिडको बसस्थानकजवळ अंडा ऑम्लेटची गाडी लावायचा, तर मोठा भाऊ सचिन आणि आई दोघे पुण्याला राहत होते. सचिन हा त्याच्या भावजीसोबत पुणे येथे लिफ्ट दुरुस्तीचे काम करतो. मृत नितीनला एक मुलगा एक मुलगी आहे. तो शांत स्वभावाचा होता, असे नातेवाइकांनी सांगितले. तर दत्ता हा एका पार्किंगच्या ठिकाणी काम करतो, असे सूत्रांनी सांगितले.
मुकुंदवाडी सिग्नलजवळ अनेक छोटी, मोठी दुकाने आहेत. जालना रोडने जाताना सिडको उड्डाणपूल संपल्यानंतर डावीकडे कुरेशी पोल्ट्री ट्रेडिंग नावाने दुकान आहे. या दुकानासमोर सर्व थरार घडला. त्यानंतर आजूबाजूची सर्व दुकाने, हॉटेल, टपऱ्या बंद झाल्या होत्या.
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, तिघांवर नन्ना आणि समीरने सत्तूरने सपासप वार केले. तिघे गंभीर जखमी झाल्याचे पाहून कुरेशी पोल्ट्रीचे दुकान बंद करून तेथून सर्व जण पसार झाले. त्यानंतर आरोपी दुचाकीवरून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्यांना पाठलाग करून पकडले, असे सूत्रांनी सांगितले. एमआयडीसी सिडको पोलिसांनी नत्रासह अन्य एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. गुन्हे शाखेची पथके अन्य आरोपींचा शोध घेत आहेत.
घटनेची माहिती मिळताच सर्वात अगोदर जवळ असलेल्या मुकुंदवाडी ठाण्यातील पोलिस घटनास्थळी धावले. त्यानंतर एमआयडीसी सिडको ठाण्याचे निरीक्षक गजानन कल्याणकर, मुकुंदवाडी ठाण्याचे प्रभारी सचिन इंगोले, एपीआय भारत पाचोळे, उपनिरीक्षक पचलोरे, पुंडलिक डाके, गुन्हे शाखेचे एपीआय रविकांत गच्चे, पीएसआय संदीप शिंदे, संदीप सोळंके आदींनी घटनास्थळी धाव घेतली होती. फॉरेन्सिकचे पथकही दाखल झाले होते.