

Nilgai rescued from deep well at Chhatrapati Sambhajinagar
छत्रपती संभाजीनगर : पुढारी वृत्तसेवा
पैठण तालुक्यातील ब्राम्हणगाव येथे एका शेतकऱ्याच्या विहिरीत एक मोठी नर नीलगाय (रोही) पडली होती. दुपारी शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याच्या लक्षात ही घटना आली. त्यांनी तात्काळ वनविभागाला याबद्दल माहिती दिली.
उपवनसंरक्षक सुवर्णा माने आणि वनपरिक्षेत्र अधिकारी सागर कुटे यांनी माहिती मिळताच, छत्रपती संभाजीनगर येथील मॅनविथइंडिज संस्थेच्या कुशल वन्यजीव बचाव पथकाला घटनास्थळी तात्काळ पाठवले.
बचाव पथकाने घटनास्थळी पोहोचताच परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांच्या प्रगत बचाव साहित्य आणि अनुभवाच्या जोरावर त्यांनी नीलगायीला अत्यंत कुशलतेने आणि सावधपणे सुखरूप विहिरीच्या बाहेर काढले.
यानंतर, पशुवैद्यक अमित परदेशी यांनी नीलगायीची वैद्यकीय तपासणी करून ती पूर्णतः सक्षम असल्याची खात्री करून घेतली. तपासणीनंतर नीलगायीला नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे परत सोडण्यात आले.
या उत्तम समन्वय आणि वेळेवर कार्यवाही केल्याबद्दल मॅनविथइंडिज संस्थेच्या बचाव पथकाचे कौतुक करण्यात येत आहे. या पथकात प्रमुख आशिष जोशी, शुभम साळवे, चिदंबर काळे, सूरज पानकडे, दीपक वाटाणे आणि हर्ष केवारे यांचा समावेश होता. या घटनेतून वन्यप्राणी संरक्षणाची जबाबदारी आणि संवेदनशीलता यांचे उत्तम उदाहरण उभे राहिले आहे.