

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने नॅक मूल्यांकन न केलेल्या ४७६ पैकी तब्बल २३३ कॉलेजांना दणका दिला आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करीता या महाविद्यालयांची प्रथम वर्षाची प्रवेश क्षमता शून्य करण्यात आली आहे. त्यामुळे या महाविद्यालयांना यंदा विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नाहीत.
उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांना नॅक मूल्यांकन करुन घेणे आवश्यक आहे. त्यासाठी उच्च शिक्षण विभागाकडून मागील अनेक वर्षांपासून पाठपुरावा केला जात होता. नॅक मूल्यांकन करुन न घेतल्यास प्रवेश क्षमता घटविण्याचा, शून्य करण्याचा इशाराही देण्यात आला होता. या अनुषंगाने व्यवस्थापन परिषदेच्या २२ नोव्हेंबर २०२४ च्या बैठकीत तसा निर्णय घेण्यात आला.
नॅक प्रक्रिया पूर्ण केलेली नाही अशा महाविद्यालयांची प्रथम वर्षाची प्रवेश क्षमता शून्य करण्याचा ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आला. त्यानुसार आता विद्यापीठ प्रशासनाने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ सुरू होण्याआधी मोठा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागाने शनिवारी आदेश जारी करुन विद्यापीठ कार्यक्षेत्रातील चार जिल्ह्यातील तब्बल २३३ कॉलेजांना प्रथम वर्षास प्रवेश देण्यास मनाई केली आहे. या महाविद्यालयांची सर्व अभ्यासक्रमांची प्रथम वर्षाची प्रवेश क्षमता शून्य करण्यात आली आहे.
विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशीव हे चार जिल्हे येतात. या जिल्ह्यात एकूण ४७६ कॉलेज विद्यापीठाशी संलग्न आहेत. यातील २३३ कॉलेजांना आता प्रवेश बंदी करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक ८७ कॉलेज हे छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील आहेत. त्यापाठोपाठ बीड जिल्ह्यातील ६४, जालना जिल्ह्यातील ५१ आणि धाराशीव जिल्ह्यातील ३१ कॉलेजांवर ही कारवाई करण्यात आली आहे.