

वैजापूर : भाजपा कार्यकर्त्याचा रस्त्याचा वाद सोडवण्यासाठी व रस्त्याची पाहणी करण्यासाठी गेलेल्या शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे व भाजप कार्यकर्ता कैलास पवार यांच्यामध्ये धक्काबुक्की व शाब्दिक चकमक झाल्याची घटना शनिवारी (१७) रोजी घडली.
मिळालेल्या महिती नुसार शहरातील जे. के. जाधव महाविद्यालयाकडे जाणा-या परिसरात नगरपलिकेने रस्त्याचे काम हाती घेतले आहे. भाजप कार्यकर्ते पवार यांचे निवासस्थान या मार्गावर आहे.त्यांनी ह्या कामात अडथळा निर्माण केल्याची लेखी तक्रार परिसरातील रहिवासीयांनी आ. बोरनारे यांच्याकडे केली होती.या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी व कामाची पाहणी करण्यासाठी आमदार बोरनारे सहकाऱ्यांसोबत गेले होते.
यावेळी नगरपलिकेचे कर्मचारी जोरे यांच्या सोबत परिसरातील नकाशा पाहून कामाबाबत चर्चा करत असताना. याठिकाणी भाजपाचे कार्यकर्ते कैलास पवार हे तिथे पोहचले तेव्हा आ.बोरनारे व पवार यांच्यात सुरुवातीला शाब्दिक चकमक होऊन नंतर धक्काबुक्की झाली. दरम्यान या प्रकारानंतर भाजपचे कैलास पवार यांनी वैजापूर पोलीस ठाणे गाठून त्यांनी आ. रमेश बोरनारे व त्यांच्या सोबतच्या सहकाऱ्यांनी मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याचा तक्रार अर्ज दिला. या तक्रार अर्जावर वैजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाळे यांनी मारहाण प्रकरणाची चौकशी करुन योग्य ती कारवाई करु असे स्पष्ट केले. या प्रकारात उशिरापर्यंत कुठलाही गुन्हा दाखल झालेला नव्हता.