

वाळूज : मुरमी येथील अल्पवयीन महाविद्यालयीन विद्यार्थिनीच्या निघृण खुनाचा वाळूज पोलिसांनी २४ तासांत उलगडा करून आरोपीला बेड्या ठोकल्या. मित्रानेच एकतर्फी वादातून तिची गळा चिरून हत्या केल्याचे तपासात समोर आले. नानासाहेब कडुबा मोरे (२७, रा. मुरमी) असे आरोपीचे नाव असल्याची माहिती पोलिस निरीक्षक शिवचरण पांढरे यांनी रविवारी (दि.२१) दिली. आरोपीला न्यायालयाने २६ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
मुरमी येथील १७ वर्षीय (कोमल नाव काल्पनिक) ही वाळूज येथील एका महाविद्यालयात इयत्ता १२ वीत शिकत होती. शुक्रवारी दुपारी ती कॉलेजवरून घरी परतली होती. आई शेतात आणि वडील पानटपरीवर गेल्याने ती घरात एकटीच होती. हीच संधी साधून आरोपी नानासाहेब मोरे याने घरात घुसून धारदार शस्त्राने कोमलचा गळा चिरला. या हल्ल्यात तिचा जागीच मृत्यू झाला. दुपारी ४ वाजेच्या सुमारास आजोबा घरी आल्यावर हा प्रकार उघडकीस आला.
घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर आणि पोलिस निरीक्षक शिवचरण पांढरे यांनी पथकांसह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. उपनिरीक्षक अजय शितोळे, रमेश राठोड, प्रवीण वाघ, अंमलदार अमोल गायकवाड, पांडुरंग शेळके विजय पिंपळे, सुधाकर पाटील, श्रीकांत सपकाळ, बजरंग धाडगे, शेख गफ्फार, नितीन देशमुख, धनजंय सानप, संदीप धनेधर, पोलिस मित्र किशोर गाडेकर, अमन शेख यांच्या पथकाने रविवारी (दि.२१) पहाटे गंगापूर परिसरातून आरोपी नानासाहेबच्या मुसक्या आवळल्या. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने हत्येची कबुली दिली.
तो संवाद ठरला अखेरचा
कोमलने दुपारी आपल्या आईशी फोनवर संवाद साधला होता, तोच तिचा शेवटचा संवाद ठरल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तिच्या आईचे डोळ्यातील अश्रु थांबत नव्हते. वैष्णवीवर रविवारी सायंकाळी मुरमी शिवारात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, मुरमी गावात पोलिस पाटील हे पद रिक्त असल्याने ते भरावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.