

NCC student attacked with a cutter while leaving for practice
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
एनसीसीच्या सरावासाठी मैदानावर निघालेल्या एका विद्यार्थ्यावर दुचाकीवर आलेल्या अनोळखी तिघांनी इकडे फिरायचे नाही, असे म्हणत कटरने पोटावर वार करून गंभीर जखमी केले. ही घटना बुधवारी (दि.३) सकाळी पाचच्या सुमारास विट्स हॉटेलसमोर घडली. परशुराम विठ्ठलराव सोळंके (१८, रा. मूळ नागापूर, परळी, बीड, ह. मु. संध्या रेसिडेन्सी, बन्सीलालनगर) असे जखमी तरुणाचे नाव आहे.
परशुराम हा देवगिरी महाविद्यालयात पदवीच्या पहिल्या वर्षात शिकत आहे. तो अकरावीपासून एनसीसीमध्ये असल्याने दररोज सरावासाठी सकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत घरापासून पायी जात असतो. नेहमीप्रमाणे सकाळी हॉटेल विट्स पासून देवगिरी कॉलेजच्या रस्त्याने वेदांत नगर गार्डनकडे जात असताना सव्वा पाचच्या सुमारास त्याला दुचाकीवर आलेल्या तिघांनी तू इकडे कुठे चालला ? असे म्हणत शिवीगाळ करून मारहाण सुरू केली. इकडे फिरायचे नाही म्हणत तोंडाला रुमाल बांधलेल्या एकाने कटर काढून परशुरामच्या पोटात मारून गंभीर जखमी केले. घाबरून परशुराम पळत सुटला.
काही अंतरावर गेल्यावर त्याने स्वामी समर्थ सेवा केंद्रातील सेवेकरी अजिंक्य तांबे यास फोन करून बोलावून घेतले. रक्तबंबाळ अस्वस्थेत त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. तेथून त्याला घाटीत हलविले. परशुरामच्या पोटावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्याने तक्रार देण्यास नकार दिल्याने जमादार जितेंद्र ठाकूर यांच्या तक्रारीवरून शनिवारी (दि.६) वेदांतनगर पोलिस ठाण्यात तीन हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.