

7,000 duplicate voters in the voter list
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेला जिल्हा निवडणूक विभागाकडून प्राप्त झालेल्या मतदार यादीत संभाव्य ५८ हजार दुबार मतदारांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, यात सारखीच नावे असलेले ७हजार दुबार मतदार असल्याची माहिती पुढे आली असून त्यासर्वांकडून महापालिका निवडणूक विभागाकडून घरोघरी जाऊन मतदान कुठे करणार, याबद्दल समंतीपत्र घेणार आहे.
महापालिकेला जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या मतदार यादीतील ५८ हजार दुबार मतदारांच्या नावांचा समावेश आहे. या दुबार मतदारांच्या यादीची महापालिकेने छाननी केली आहे. यातील बहुताश एकापेक्षा अधिक नावे असलेल्या मतदारांची नावे काढण्यात आली. दुबार मतदार यादीमध्ये १४ हजार नावे एकसारखी असल्याचे आढळले.
मात्र, असलेतरी मतदारांची संख्या केवळ ७हजार इतकीच आहे. या मतदारांच्या घरोघरी प्रगणक जाऊन त्यांच्याकडून कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करणार या आशयाचे समंतीपत्र घेतले जात आहे. दुबार मतदारांनी आपापल्या प्रभागात जाऊन मतदार यादीमधील नावांची खात्री करून मतदान कुठे करणार, याबद्दल लेखी संमती देण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
रावरसपुराचे ८०० मतदार वगळले
प्रभाग ४ च्या मतदार यादीमध्ये रावरसपुरा ग्रामपंचायतीमधील सुमारे दीड हजार मतदारांचा समावेश केला आहे, असा आक्षेप शिवसेना ठाकरे गटाचे उपशहरप्रमुख गणेश लोखंडे यांनी नोंदविला होता. त्याची दखल घेत महापालिकेच्या पथकाने स्थळपाहणी केली. त्यात रावरसपुरा ग्रामपंचायतच्या हद्दीतील सुमारे ८०० मतदार हे जिल्हा परिषदेच्या मतदार यादीमध्ये असल्याचे आढळले. त्यावरून ही नावे वगळण्यात आली.
४ हजार ५८१ आक्षेप निकाली
महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादीवर ७ हजार ५६७ आक्षेप प्रशासनाला प्राप्त झाले होते. त्यातील ४ हजार ५८१ आक्षेपांचा निपटारा करण्यात आला. उर्वरित आक्षेपांचा निपटारा ९ डिसेंबरपर्यंत केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.