

Five-star Shendra MIDC No infrastructure
राहुल जांगडे
छत्रपती संभाजीनगर: पंचतारांकित शेंद्रा एमआयडीसीत उद्योगांना उत्कृष्ट आणि गुणवत्तापूर्ण पायाभूत सुविधा देण्यासाठी उद्योजकांना विविध शुल्क आकारले जातात. मात्र सुविधा देण्याच्या नावाने नुसतीच बोंबाबोंब आहे. त्यामुळेच एमआयडीसीत बहुतांश ठिकाणी खराब रस्ते, बंद पथदिवे, झाडेझुडपे वाढलेली, कचरा पडलेला अन् उघड्या गटारी... अशा दयनीय, दुरवस्थेचे चित्र आहे. व्यवसायपूरक सर्व सुविधा न देता नियमांच्या नावाने भुर्दंड असल्याचा संताप उद्योजकांकडून व्यक्त होत आहे.
टॅक्स वसुली म्हणजे, नाहकचा फाईव्ह स्टार नव्हे स्लम औद्योगिक वसाहत छत्रपती संभाजीनगर सारख्या टोयोटा-किर्लोस्कर, जेएसडब्ल्यू, इथरसह अनेक नामांकित कंपन्यांचे प्रकल्प सुरू होणार आहेत. यासह आणखी नवनवीन उद्योग यावेत. यासाठी शासनाचे विशेष प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे इथे कार्यरत उद्योगांनाच उद्योगनगरीत आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात एमआयडीसी प्रशासन तोकडे पडत असल्याचे चित्र आहे.
इथल्या पंचतारांकित शेंद्रा एमआयडीसीत विविध नामांकित कंपन्यांसह लहान-मोठे एक हजाराहून अधिक उद्योग आहेत. या उद्य-ोगांकडून दर महिन्याला रोड टॅक्स, मेंटनन्सचा खर्च, वॉटर टॅक्स, फायर टॅक्ससह सेवा शुल्क, पर्यावरण शुल्कही प्लॉटच्या आकारानुसार आकारले जातात. मात्र चांगले रस्ते नाही, असंख्य पथदिवे बंद पडले आहेत. विस्कळीत पाणीपुरवठ्याची समस्याही भेडसावत आहेत. ड्रेनेजलाईनची सुविधा नाही. इतकेच नव्हे तर साधे कचरा व्यवस्थापनाचे नियोजन नसल्याने एमआयडीसीत जागोजागी कचरा फेकला जातोय. खुल्या प्लॉटवर ढिगारे लागली आहेत. सगळीकडेच झाडेझुडपे वाढल्याने अक्षरशः एमआयडीसीचे जंगलच झाले आहे.
खराब रस्त्यांमुळे दळणवळणावर परिणाम
शेंद्रा एमआयडीसीत अनेक कंपन्यांकडून दररोज आयात-निर्यात सुरू असते. मात्र येथील खराब आणि खड्डेमय रस्त्यांमुळे माल वाहतूक आणि सुरळीत दळणवळणात अडचणी येत आहेत. यामुळे उद्योगांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
फाईव्ह स्टार नाही, किमान सुविधा तर द्या
पंचतारांकित औद्योगिक वसाहत म्हटले की, उद्योगांना सर्व काही उत्कृष्ट आणि दर्जेदार पायाभूत सुविधा मिळत असतील, हा गैरसमज असल्याचे येथील उद्योजकांनी सांगितले. उद्योगांकडून सेवा कर, पर्यावरण कर वसूल करताय ना, मग एमआयडीने फाईव्ह स्टार नाही किमान मूलभूत सुविधा तरी द्याव्यात, अशी मागणीही केली आहे.
पावसाळ्यात अनेक उद्योग बंद
या औद्योगिक क्षेत्रात सांडपाण्याची व्यवस्था नाही. आहे त्या नाल्यांमध्ये कचरा तुंबला आहेत. ठिकठिकाणी संरक्षक जाळ्या तुटल्याने याच नाल्या धोकादायक झाल्या आहेत. पावसाळ्यात तर अक्षरशः अनेक कंपन्यांमध्ये पाणी शिरते. त्यामुळे अनेकदा उद्योग बंद ठेवावे लागतात, असा संतापही उद्योजकांनी व्यक्त केला.