

Natural Beehives Are Becoming Rare
भागवत खरग
कडेठाण : पैठण तालुक्यातील कडेठाण, आडूळ, पाचोड, केकत जळगाव, हर्षी, पारुंडी, तुपेवाडी, बालानगर, खादगाव, दरेगाव, रांजणगाव दांडगा, सुलतानपूर, गेवराई मर्दा या परिसरात एकेकाळी झाडाझुडपांमध्ये सहज दिसणाऱ्या मधमाशांचे मोहळ आता दुर्मिळ होत चालले आहे. ग्रामीण भागात मधमाशांची संख्या झपाट्याने घटत असून, त्याचा थेट परिणाम फळबागांच्या उत्पादनावर होत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहेत.
नैसर्गिक मोहोळांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने शेती क्षेत्रावर त्याचा थेट परिणाम होत आहे. परागीकरणासाठी मधमाशा अत्यंत महत्त्वाच्या असल्यामुळे त्यांच्या घटत्या संख्येमुळे पिकांचे उत्पादन कमी होत आहे. विशेषतः फळबाग, भाजीपाला आणि तेलबिया पिकांना याचा मोठा फटका बसत आहे. शेतीमध्ये वाढत्या प्रमाणात कीटकनाशकांचा वापर आणि बदलते हवामान या दुहेरी फटक्यामुळे मधमाशांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. परागीकरणासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या मधमाशा मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडत आहेत. याचा परिणाम आंबा, डाळिंब, मोसंबी, लिंबू यांसारख्या फळपिकांच्या उत्पादनावर होत आहे.
नैसर्गिक मोहोळ सापडणेही आता दुर्मिळ झाले असून अनेक शेतकऱ्यांना कृत्रिम पद्धतीने मधमाशांचे पालन (वी-कीपिंग) करावे लागत आहे किंवा बाहेरून मधमाशांच्या पेट्या आणाव्या लागत आहेत. यामुळे उत्पादन खर्चात वाढ होत असून अपेक्षित परागीकरणही होत नाही. पूर्वी नैसर्गिकरित्या मोहोळे असायची, त्यामुळे उत्पादन चांगले यायचे. आता मधमाशा कमी झाल्याने फळधारणा कमी झाली आहे. मधमाशांचे संवर्धन आणि पर्यावरण-पूरक शेती पद्धतींचा अवलंब केला तरच ही समस्या कमी होऊ शकते, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
किटकनाशक ठरले कारण
कीटकनाशकांच्या फवारणीमुळे मधमाशा दगावत असून, उत्पादन घटत आहे. कृत्रिम मधमाशांचा वापर करावा लागत असल्याने खर्चात वाढ होत असल्याचे केकत जळगाव येथील अजिनाथ बढे या शेतकऱ्यांनी सांगितले.
मधमाशांचे संवर्धन गरजेचे
मधमाशा शेतीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असून त्यांचे संवर्धन आवश्यक आहे. कीटकनाशकांचा नियंत्रित वापर करणे, तसेच बांधावर फुलझाडांची लागवड करणे गरजेचे असल्याचे परभणी येथील मराठवाडा कृषी विद्यापीठाचे तज्ज्ञ पी.एस. नेहरकर यांनी सांगितले.
अन्यथा उत्पादनावर गंभीर परिणाम
मधमाशांचे संवर्धन करण्यासाठी शासनाने ठोस धोरण राबवावे, अन्यथा भविष्यात फळबागांच्या उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.