Gangapur News : ढगाळ वातावरणाचा रब्बी पिकांना फटका
Gangapur News: Cloudy weather affects Rabi crops
गंगापूर, पुढारी वृत्तसेवा : मागील तीन दिवसांपासून परिसरात सातत्याने पसरलेल्या ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील पिके पुन्हा एकदा धोक्यात आली आहेत. आधीच अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम पूर्णतः वाया गेल्याने शेतकरी मोठ्या अपे-क्षेने रब्बी पिकांकडे पाहत होते. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे आता हरभरा, गहू, तूर आदी प्रमुख पिकांवर रोग व किडींचे सावट पसरले असून बळीराजाची चिंता अधिकच वाढली आहे.
ढगाळ हवामानामुळे हवेत आर्द्रतेचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. परिणामी हरभरा पिकावर करपा, मर व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून येत आहे. अनेक शेतांमध्ये हरभऱ्याच्या झाडांवर पिवळसरपणा येऊन पाने वाळण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
तसेच रब्बीतील प्रमुख पीक असलेल्या हरभऱ्यावर घाटेअळीचा मोठ्या प्रमाणात हल्ला झाल्याचे चित्र आहे. काही भागांत बहरलेल्या तूर पिकावरही अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेंगा लागण्याच्या अवस्थेत असलेले पीक धोक्यात आले आहे.
गहू पिकावरही ढगाळ हवामानाचा विपरीत परिणाम दिसून येत असून पानांवर तांबेरा व विविध डाग पडल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून येत आहेत. सकाळचे धुके व दिवसभर ढगाळ वातावरण यामुळे रोग वाढीस पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे. गहूसह मका व ज्वारी पिकांवरही बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने उत्पादन घटण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, खरीप हंगामातील नुकसानानंतर रब्बीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा संकटाचा सामना करावा लागत असल्याने कृषी विभागाने तातडीने व्यापक पाहणी करून पीकविम्याच्या माध्यमातून ठोस दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.
कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन
याबाबत तालुका कृषी अधिकारी बापुराव जायभाये यांनी सांगितले, सध्या ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकांवर रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता शिफारस केलेल्या बुरशीनाशक व कीटकनाशकांची योग्य मात्रेत फवारणी करावी. कृषी विभागामार्फत प्रत्यक्ष शेतात पाहणी करून शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन दिले जात आहे. कुठे मोठ्या प्रमाणात नुकसान दिसून आल्यास त्याबाबत वरिष्ठ पातळीवर अहवाल पाठवून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील.

