

Due to cloudy weather, the gram crop is experiencing an infestation of pod borer
कन्नड, पुढारी वृत्तसेवा: तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण राहिल्याने हरभरा पिकावर घाट अळीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. सध्या हरभरा पीक फुलोरा व घाटे धरण्याच्या अवस्थेत असल्याने पडत असलेल्या घाट अळीचा हल्ला अधिक घातक ठरत आहे.
अनेक शेतांतील हरभऱ्याच्या घाट्या पोखरलेल्या व पाने कुरतडलेली दिसून येत असून उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तालुक्यातील औराळा, चिंचोली लिंबाजी, पिशोर, नाचनवेल, देवगाव रंगारी परिसरातील शेतकऱ्यांनी अळीचा प्रादुर्भाव वाढल्याचे सांगितले.
ढगाळ हवामान, वाढलेली आर्द्रता व कमी सूर्यप्रकाशामुळे घाट अळीच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी शेतकरी उशिरा प्रादुर्भावाच्या लक्षणांकडे लक्ष देत असल्याने नुकसान वाढत असल्याचेही चित्र आहे. अचानक वाढलेल्या कीड प्रादुर्भावामुळे आधीच खर्चाच्या ओझ्याखाली असलेल्या शेतकऱ्यांपुढे नवे संकट उभे राहिले आहे.
योग्य वेळी नियंत्रण न केल्यास हरभऱ्याच्या उत्पादनात ३० ते ४० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कृषी विभागाने गावोगावी मार्गदर्शन शिबिरे आयोजित करून शेतकऱ्यांना तत्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे.
तात्काळ उपायोजना गरजेच्या
सध्या हरभरा पिकावर आढळणारी घाट अळी ही घाट्यांवर थेट हल्ला करत असल्याने निश्चितच याचा उत्पादनावर मोठा परिणाम होतो. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात दररोज फेरफटका मारून प्रादुर्भावाची पातळी तपासावी. एका सरीत सरासरी दोन ते तीन अळ्या आढळल्यास तत्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे.
सुरुवातीच्या अवस्थेत निंबोळी अर्क किंवा जैविक कीटकनाशकांचा वापर करावा. प्रादुर्भाव अधिक असल्यास शिफारशीनुसार योग्य कीटकनाशकांची फवारणी करावी; मात्र फवारणी करताना लेबल क्लेम व सुरक्षितता नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे असे कन्नड तालुका कृषी अधिकारी संदीप शिरसाठ यांनी सांगितले.