

वैजापूर : नांदूर-वितरिकेचे मधमेश्वर कालव्याच्या वैजापूर ते गंगापूर येथील अस्तरीकरण आणि दुरुस्तीचे सध्या काम सुरू आहे. सुमारे अकरा कोटी रुपयांचे हे काम अत्यंत्य निकृष्ट दर्जाचे सुरू आहे. अस्तरीकरण केलेल्या सिमेंट काँक्रीटला आठवड्याभरात तडे गेले. हाताने उकरले तरी काँक्रीट निघत असल्याचे उघड झाले आहे. त्याबाबत पाटबंधारे विभागाकडे तक्रारी गेल्या, असे असतानाही पाटबंधारे विभाग कागदीघोडे नाचविण्यापलहकडे काहीच हालचाल करताना दिसत नाही. विशेष म्हणजे तक्रारीनंतरही ठेकेदाराकडून त्याच पद्धतीने ते काम सुरू आहे.
वैजापूर-गंगापूर या दुष्काळी भागातील शेतीला पाणी मिळावे यासाठी नांदूर मधमेश्वर प्रकल्पातून एक्सप्रेस कालवा करण्यात आला; परंतु वितरिकेचे काम रखडले होते. ते सुरू झाले आहे. कालवा क्र. २ वरील तब्बल साडेस-हजार मीटर वितरिकेच्या अस्तरीकरण आणि दुरुस्तीचे तब्बल अकरा कोटींचे काम वैजा-पूरच्याच के. के. कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराला देण्यात आले. २ मे रोजी कार्यकारी अभियंता राकेश गुजरे यांनी या ठेकेदाराला कर्यारंभ आदेश दिला. नुकतेच हे काम सुरू झालेले आहे. कालव्याचे निकृष्ट दर्जाचे काम झाले असून हाताने उकरले तरी काँक्रीट निघत असल्याचे उघड झाले आहे.
दर्जाशी तडजोड,शेतकऱ्यांचा हिरमोड
या कालव्याचे अस्तरीकरण आणि दुरुस्ती सुरू झाल्याने वैजापूर आणि गंगापूर या दोन्ही तालुक्यांतील लाभधारक शेतकऱ्यांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण होते. कारण या कामामुळे शेतकऱ्यांना हक्काचे पुरेपूर पाणी मिळण्याची आशा निर्माण झाली होती. मात्र काम सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांचा हिरमोड झाल्याचे दिसून येत आहे. कारण ठेकेदाराकडून अत्यंत दर्जाहीन काम सुरू असल्याची ओरड परिसरातील शेतकऱ्यांनी सुरू केली आहे.
अस्तरीकरणासाठी नियमानुसार काँक्रीटच्या खाली प्लास्टिक पेपरचा वापर गरजेचा होता. अनेक ठिकाणी प्लास्टिकचा वापरच झालेला नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शिवाय येथे करण्यात येत असलेले सिमेंट काँक्रीट अत्यंत दर्जाहीन असल्याच्या तक्रारी आहेत. पुढारी प्रतिनिधीने प्रत्यक्ष जाऊन या कामाची पाहणी केली, तेव्हा अक्षरशः आठ दिवसांपूर्वीच केलेल्या अस्तरीकरणाच्या कामाला तडे गेल्याचे दिसून आले.
जागोजागी हाताने उकरले तरी काँक्रीट निघत होते.नियमानुसार काँक्रीटचा जितका थर हवा त्यापेक्षा अनेक ठिकाणी तो खूप कमी आहे. विशेष म्हणजे हे काम सुरू असताना कामाच्या ठिकाणी वैजापूर पाटबंधारे कार्यालयाच्या गुणवत्ता नियंत्रक पथकाने उपस्थित असणे गरजेचे होते. हे पथक कामाच्या ठिकाणी गेलेलेच नाही.या कामाचा अधिकाऱ्यांच्या अशीर्वादाने ठेकेदाराकडून केवळ दिखाऊपणा सुरू असल्याचे पुढारी प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत आढळून आले.
चौकशी नावालाच
या कामाबाबत पटबंधारे विभागाकडे लेखी तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यानंतर जास्तच आरडाओरड झाल्यामुळे पाटबंधारे विभागाने या तक्रारीचा चौकशी अहवाल पाठविण्याचे आदेश वैजापूर कार्यालयाला दोन दिवसांपूर्वी दिले. विशेष म्हणजे ज्या वैजापूर कार्यालयाला या कामाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, यात त्यांचाच बराच दोष आहे. मग त्यांच्याकडून खरा चौकशी अहवाल येईल तरी कसा? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या कामाची दक्षता पथकामार्फत चौकशी करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. विशेष म्हणजे या कामाच्या तक्रारी झाल्यानंतरही पाटबंधारे विभागाने कागदीघोडे नाचविण्याच्या पलीकडे काहीही केले नाही. त्यामुळे ठेकेदाराकडून हे काम तशाच निकृष्ट पद्धतीने सुरू असल्याचे परिसरातील शेतकऱ्यांनी सांगितले.