

Murder Case at Gavali Shivra Solved
लासूर स्टेशन, पुढारी वृत्तसेवा : गंगापूर तालुक्यातील गवळी शिवरा येथे ५ मे रोजी सुमन कडू काकडे यांच्या डोक्यात वार करून खून करण्यात आला होता. या खुनाचा उलगडा शिल्लेगाव पोलिसांनी केला आहे. शनिवारी आर-ोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. वामन माधव जगताप रा. गोपाळवाडी, ता. गंगापूर असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी वामन जगताप आणि मयत महिला सुमन काकडे यांचे गेल्या पंचवीस वर्षांपासून प्रेमसंबध होते. मागील तीन महिन्यांपासून मयत महिला ही लासूर स्टेशन येथे प्लॉट घेऊन द्या असा तगादा आरोपीकडे लावत होती.
तसेच सतत पैशाची मागणी करत होती. याला कंटाळून आरोपीने ४ मे रोजी सकाळी मयत महिलेला लासूर स्टेशन येथून मोटारसायकलवर बसवून आरापूर ते गवळी शिवरा जाणाऱ्या रोडच्या बाजूला पडीत शेतात नेले तेथे दोघामध्ये प्लॉट आणि पैशावरून बाचाबाची झाल्याने आरोपीने लोखंडी नळीने मयताच्या डोक्यात मारून ठार केले.
या प्रकरणी शिल्लेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास करताना मयत महिलेच्या नातेवाईकांनी वामन जगताप याच्यावर संशय व्यक्त केला होता. पोलिसांनी जगताप याला शनिवारी अटक केली.
पैशाच्या तगादामुळे काढला काटा
आरोपी वामन जगताप आणि मयत महिलेचे प्रेमसंबध होते. यातुन सदर महिला आरोपीकडे वारंवार पैशाची मागणी करत असल्याने वैतागून सदर महिलेचा खून केल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिली.