

लासूर स्टेशन : गवळीशिवरा आरापूर शिवारात एका 46 वर्षीय महिलेचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना मंगळवार दि.5 मे रोजी दुपारी उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सुमन कडू काकडे (46, रा. वडाळी, ह.मु.गवळी धानोरा, ता. गंगापूर असे मृत महिलेचे नाव आहे.
घटनेची माहिती मिळताच शिल्लेगाव पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला यानंतर घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, पोलिस उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश पालवे,पोलिस निरीक्षक सलीम चाऊस यांनी देखील भेट दिली.
दरम्यान घटनास्थळावरील महिलेच्या मृतदेहावरून दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आल्याचे पोलिसांनी अंदाज व्यक्त केला. याप्रकरणी नातेवाइकांच्या तक्रारीनंतर अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती शिल्लेगाव पोलिसांनी दिली.
वडाळी येथील रहिवासी मयत सुमन या त्यांच्या माहेरी गवळी धानोरा येथे भावाकडे राहत होत्या. केवायसी करण्यासाठी लासूर स्टेशनला जाते म्हणून सोमवारी कागदपत्रे घेऊन घराबाहेर पडल्या. त्यानंतर घरी न परतल्याने नातेवाईकांनी त्यांचा बराच शोध घेतला होता. मंगळवारी दुपारी एका शेतकऱ्याने शेत नांगरणीचे काम सुरू असताना गवळीशिवरा शिवारातील रस्त्यालगत असलेल्या गट क्रमांक 89 मध्ये एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला.
त्यानंतर सदर माहिती पोलिस पाटील बद्रीनाथ केरे यांनी पोलिसांना दिली. सदर माहिती शिल्लेगाव पोलिसांना मिळताच घटनास्थळी धाव घेऊन महिलेची ओळख पटवून तपासाची चक्री फिरवली.मृत महिलेचा चेहरा दगडाने ठेचल्याने ओळख पटविण्याचे आव्हान होते. शेवटी पोलिसांनी गायब झालेल्या महिलांची यादीवरून तसेच इतर लक्षणावरून सदर महिलेची ओळख पटविली.
लवकरच आरोपीला पकडू
पोलिसांनी पुढील तपासाची चक्रे जलद गतीने फिरवली आहे. मयत महिलेचे प्रेत शवविच्छेदनानंतर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान आरोपीच्या शोधासाठी शिल्लेगाव पोलिसांच्या हालचाली सुरू केल्या असून लवकरच आरोपीला गजाआड करणार असल्याने पोलिसांनी सांगितले.