

Municipal notice to religious places in Hersul
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: हर्सूल टी पॉइंट ते समृद्धी लॉनपर्यंतचा रस्ता २०० फूट रस्ता रुंदीकरणात बाधित ठरणाऱ्या एका कब्रस्थानला महापालिकेने नोटीस बजावली असून यासंदर्भात सोमवारी (दि.४) धर्मगुरुंची बैठक पार पडली. यात धर्मगुरू जो निर्णय घेतील त्यानुसार पवित्रा घेणार असल्याचे मस्जिद कमिटीचे अध्यक्ष यूनुस पटेल यांनी सांगितले. तर पाडापाडी करण्यापूर्वी मोबदला द्या, त्यानंतरच कारवाई करा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
हर्सूल टी पॉइंट ते समृद्धी लॉनपर्यंतचा रस्ता २०० फूट रुंद करण्यासाठी रस्ता रुंदीकरणात बाधित ठरणाऱ्या हसूल गावातील मालमत्तांची महापालिकेकडून पाडापाडी केली जाणार आहे. यासाठी मनपाच्या नगररचना विभागाने १५ जुलै रोजी हसूलच्या रस्त्यांवर मार्किंग केली आहे. मात्र यामार्गावर दोन मंदिरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, दोन बुध्द विहार, तीन मस्जिदसह तीन कब्रस्थान बाधित होत आहे.
त्यावरून सोमवारी मस्जिद कमिटीचे अध्यक्ष युनुस पटेल यांच्यासह या भागातील मस्जिद अध्यक्ष, गावातील सर्वधर्मीय प्रतिष्ठित नागरिकांची बैठक पार पडली. यात यावर धर्मगुरू निर्णय घेणार आहेत. त्यामुळे त्यांनी घेतलेल्या निर्णयानंतरच पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे, असे मस्जिद कमिटीचे अध्यक्ष युनुस पटेल यांनी सांगितले.
दरम्यान एका कब्रस्थानला महापालिकेने नोटीस बजावली असून सात दिवसांत ते हटवण्यात यावे, असे या नोटिसीत नमूद असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र या ठिकाणी असलेल्या कब्रस्थानमध्ये हजारो अंत्यविधी केलेले आहेत, याचाही विचार महापालिकेने करावा असेही ते म्हणाले.
जी-२० परिषेदेवेळीही पाडापाडी
हसूल टी पॉइंट ते समृद्धी लॉनपर्यंतचा रस्ता दीड वर्षापूर्वीच जी-२० परिषेदच्या निमित्ताने विदेशी पाहुणे अजिंठा लेण्या पाहण्यासाठी जातील. त्यांच्यासाठी १०० फूट रुंद केला होता.
त्यावेळी नॅशनल हायवेने मालमत्ताधारकांना रोख स्वरूपात मोबदलासुद्धा दिला होता. आता उर्वरित १०० फूट रस्ता रुंद करण्यासाठी महापालिका प्रशासन सरसावल्याने मालमत्ताधारक हवालदिल झाले आहेत. या भागात नागरिकांकडून विरोध होत असून मोबदल्याची मागणी होत आहे.
आधी मोबदला द्या, मगच कारवाई करा
या २०० फूट रुंदीकरणामुळे पन्नास टक्के मालमत्ताधारकांना काहीच जागा शिल्लक राहत नाही. त्यामुळे मालमत्ताधारकांची झोप उडाली आहे. काही मालमत्ताधारकांनी नुकतेच बांधकाम केले आहे. काहींनी तर अद्याप गृहप्रवेशही केलेला नसून त्यांचीही घरे यात बाधित होत आहे. त्यामुळे त्यांना बेघर होण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नसून पाडापाडीपूर्वी महापालिकेने मोबदला द्यावा, त्यानंतरच कारवाई करा, अशी मागणीही पटेल यांनी यावेळी केली.