

tried to break the ATM by dragging it with a Thar jeep
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
एटीएम मशीनला वेल्टच्या साह्याने थार जीपला बांधून चार चोरट्यांनी बाहेर ओढून फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा प्रयोग फसल्याने चोरट्यांनी तेथून -धूम ठोकली. हा प्रकार सोमवारी (दि.४) पहाटे चारच्या सुमारास शहानूरवाडी दर्गा परिसरातील एसबीआय बँकेच्या शाखेतील एटीएम येथे घडला. या घटनेत एटीएम मशीन व केबिनमधील - सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नुकसान करण्यात आले. सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
फिर्यादी विशाल हरिदास इंदूरकर (वय ४८, रा. मिलेनिअम पार्क, चिकलठाणा) हे एसबीआयच्या शहानूरवाडी शाखेत मॅनेजर आहेत. त्यांच्या फिर्यादीनुसार, सोमवारी पहाटे ३ ते ४ वाजेच्या दरम्यान चार चोरांनी बँकेच्या एटीएम मशीनला महिंद्रा थार जीपला बेल्टच्या साह्याने बांधून मशीन बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला. तसेच स्क्रू ड्रायव्हरने एटीएमचे कव्हर उचकटण्याचा प्रयत्न करत केबिनमधील कॅमेरेही फोडण्यात आले. मात्र, चोरट्यांना प्रयत्न अपयशी ठरला. याप्रकरणी उपनिरीक्षक मारोती खिल्लारे यांनी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून घेत अधिक तपास जमादार जाधव यांच्याकडे दिला.
सीसीटीव्हीत घटना कैद
पहाटे चारच्या सुमारास चार चोरटे एटीएम मशीनला बेल्टच्या साह्याने थार जीपला बांधून ओढण्याचा प्रयत्न करत होते. जीप रिव्हर्स घेऊन एटीएम जवळ लावण्यात आली. चालकाने फूल रेस करून मशीन ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र, बेल्ट तुटल्याने चोरटे तेथून पसार झाले. सर्वजण तोंडाला मास्क लावून आलेले होते.