

Talathi, Kotwal caught taking bribe in Paithan tehsil
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जमिनीचे वाटणीपत्र करून देण्यासाठी कोतवालामार्फत १० हजारांची मागणी करून ८ हजारांची लाच घेताना आ-पेगावचा तलाठी एसीबीच्या जाळ्यात अडकला. ही कारवाई सोमवारी (दि.४) पैठण तहसील कार्यालयाच्या इमारतीत करण्यात आली. तलाठी अक्षय बबनराव बिनीवाले (वय ३०, रा. पीरवाडी, ता. बदनापूर, जि. जालना, ह.मु. म्हाडा कॉलनी, पैठण) आणि कोतवाल सोमनाथ राघू कोल्हे (वय ३६, रा. आ-पेगाव, ता. पैठण) अशी आरोपींची नावे असल्याची माहिती एसीबीच्या पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे यांनी दिली.
३९ वषीय तक्रारदार यांचे मौजे अगर नांदूर, ता. पैठण शिवारात गट क्रमांक ५८ मध्ये शेत जमीन समाईक क्षेत्र ५० आर होते. त्यापैकी तक्रारदार यांच्या नावे १६ आर जमीन क्षेत्र आहे. २५ जुलै रोजी तक्रारदार यांनी वाटणीपत्र करण्याकरिता बॉण्ड तयार करून जमिनीचे कागदपत्राची फाईल आपेगाव तलाठी सज्जाचा कोतवाल कोल्हेकडे दिली होती. शुक्रवारी (दि.१) यांनी कोल्हेला संपर्क करून जमिनीची वाटणीपत्रकरिता दिलेल्या फाईल संदभीने विचारपूस केली. तेव्हा त्याने जमिनीची वटणीपत्र करून देण्यासाठी १० हजारांची मागणी केली. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागाकडे तक्रार केली.
सोमवारी एसीबीने पडताळणी करण्यासाठी तक्रारदारास कोतवाल कोल्हेकडे पाठविले. कोल्हेने तक्रारद-तक्रारदार ारकडे वाटणीपत्रचा प्रस्ताव तलाठी यांच्याकडे पाठविण्यासाठी ८ हजारांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. ही कारवाई पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक चैनसिंग गुसिंगे, धर्मराज बांगर, राजेंद्र नंदिले, युवराज हिवाळे, सी. एन बागुल यांच्या पथकाने केली.
गळ्यातील रुमाल हातात घेताच पकडले
सोमवारी एसीबीच्या पथकाने पैठण तहसील कार्यालयाच्या इमारतीत सापळा लावला. तेव्हा कोतवाल कोल्हे याने तलाठी बिनीवाले याला फोन करून व प्रत्यक्ष भेटून तक्रारदार यांच्या वाटणीपत्राच्या कामासाठी ८ हजार रुपये घेत असल्याचे कळविले. बिनीवाले यानेदेखील त्याला संमती देऊन प्रोत्साहन दिले. त्यानंतर कोल्हेला ८ हजार देऊन तक्रारदाराने गळ्यातील रुमाल हातात घेताच पथकाने कोल्हेला रंगेहाथ पडकले. त्यानंतर तलाठ्यालादेखील ताब्यात घेतले. याप्रकरणी पैठण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.