

Municipal election The final voter list will be published today.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रशासनाने तयार केलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांवर ७ हजार ५६७ आक्षेप दाखल झाले होते. या आक्षेपांचे महापालिका निवडणूक विभागाने निराकरण केले असून, अंतिम यादी आज अधिप्रमाणित करून सर्व दहा झोन कार्यालयामध्ये प्रसिद्ध केली जाणार आहे. परंतु संभाव्य ५८ हजार दुबार नावांपैकी बहुतांश नावे यादीत जैसे थेच असल्याची चर्चा आहे.
महापालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या तयार करण्याचे आदेश निवडणूक विभागाने महापालिका प्रशासनाला दिले होते. त्यानुसार महापालिकेने प्रारूप याद्या तयार करण्याचे काम केले. परंतु याद्या प्रसिद्ध करण्यापूर्वीच आयोगाने याद्यांच्या कामाला मुदतवाढ दिली. ही मदतवाढ सलग दोन वेळा देण्यात आली.
त्यामुळे ४ नोव्हेंबरहून मतदार यादी प्रसिद्ध करण्याची तारीख २० नोव्हेंबर करण्यात आली. त्यानुसार मतदार याद्या प्रसिद्ध करून त्यावर हरकती व सूचना मागविण्यात आल्या, परंतु त्यानंतर पुन्हा आयोगाने सुधारित कार्यक्रम जाहीर करून हरकती-सूचनांसाठी २७ नोव्हेंबर ऐवजी ३ डिसेंबर शेवटची तारीख देण्यात आली.
त्यानंतर अंतिम याद्या अधिप्रमाणित करून त्या प्रसिद्ध करण्याची तारीख १० डिसेंबरहून १५ डिसेंबर करण्यात आली. त्यानुसार आक्षेपांचे निराकरण करून कंट्रोल चार्ट अपलोड करण्यात आले आहेत. रात्रंदिवस काम करून महापालिका निवडणूक विभागाने याद्यांवरील आक्षेपांचे निराकरण केले. आता अंतिम यादी आयोगाने अधिप्रमाणित केल्यानंतर आज प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
संभाव्य दुबार नावांवर प्रश्नचिन्ह
आयोगाच्या सूचनेनुसार विधानसभा निवडणुकीसाठी वापरलेल्या मतदार याद्यांचा आधार घेत महापालिकेने प्रभागनिहाय संभाव्य याद्या तयार केल्या. या याद्यातच संभाव्य ५८ हजार मतदारांची दुबार नावे होती. त्यात नावात साम्य असलेली, नाव आणि व्यक्त एकच असलेली दुबार नावांचा समावेश होता. परंतु यातील बहुतांश नावे ही इच्छुकांच्या दबावामुळेच जैसे थे असल्याची चर्चा आहे. परंतु या नावांचा निर्णय येत्या आठवडाभरात होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
मतदार केंद्राची यादी...
मतदार याद्या अंतिम झाल्यानंतर आता २० डिसेंबरपर्यंत मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर या मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.