

Municipal election: The BJP poses a strong challenge to the Guardian Minister's daughter.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या कन्या हर्षदा शिरसाट या प्रभाग क्रमांक १८ वेदांतनगर येथून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्यांच्यासमोर भाजपाच्या मयुरी उत्तम बरथुने यांनी तगडे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे अवघ्या जिल्ह्याचे या लढतीकडे लक्ष लागले आहे.
महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला आता वेग आला आहे. शहरातील एकूण २९ प्रभागांमधील प्रमुख लढतीपैकी प्रभाग १८ मधील लढतीकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या प्रभागातून पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या कन्या हर्षदा शिरसाट यांनी शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
शिरसाट यांनी सुपूत्र सिद्धांत शिरसाट यांच्यानंतर यावेळी आपल्या कन्येला निवडणूकीच्या रिंगणात उतरवले आहे. त्यांच्या विरोधात भाजपाच्या मयुरी बरथुने आणि राष्ट्रवादी (श.प.) च्या वर्षा सोनवणे आणि दोन अपक्ष उमेदवार असून, अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी चार अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली.
तरी या प्रभागामध्ये खरी लढत ही हर्षदा शिरसाट आणि मयुरी बरथुने यांच्यात रंगणार आहे. या निवडणुकीत त्यांनी भाजपाकडून अधिकृत उमेदवारी मिळवून शिवसेनेच्या हर्षदा शिरसाट यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केल्याने राजकीय वर्तुळात याच लढतीची चर्चा सुरू आहे.