

Sillod News: Aspiring candidates are holding meetings, and leaders are searching for capable candidates
सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : गेल्या तीन वर्षांपासून रखडलेली जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा बिगुल सोमवारी (दि. ५) वाजण्याची शक्यता आहे. तर या आधीच इच्छुक कामाला लागले असून गट, गणांचा दौरा करीत कार्यकर्ते, मतदारांच्या गाठीभेटी घेत आहे. इच्छुक कामाला लागले असले तरी सर्वच पक्षांचे नेते मात्र सक्षम उमेदवारांचा शोधात आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समितीवर जवळपास तीन वर्षांपासून प्रशासक आहे. तब्बल आठ वर्षानंतर या निवडणुका होत आहे. तर या निवडणुकीत एक गट व दोन गण वाढल्याने जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांची संख्याही अनुक्रमे एक व दोनने वाढली आहे. तर काही गट, गणांमध्ये इच्छुकांची संख्याही वाढली आहे. गट, गण वाढल्याने नवीन नेतृत्व उदयास येणार असून गावागावात निवडणुकीची चर्चा रंगत आहे.
या निवडणुकीत एक गट, दोन गण वाढल्याने पूर्वीच्या गट, गणांच्या गावांची अदला बदल झालेली आहे. यामुळे प्रस्थापित नेत्यांनाही या निवडणुकीत चांगलीच कसरत करावी लागणार आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना (शिंदे गट), भाजपसह महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. गेल्या निवडणुकीच्या वेळी आ. अब्दुल सत्तार काँग्रेसमध्ये होते. त्यावेळी जिल्हा परिषदमध्ये काँग्रेस, भाजपला प्रत्येकी चार चार जागा मिळाल्या होत्या. तर नऊ जागा जिंकत पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकला होता. मात्र अडीच वर्षानंतर फोडाफाडीच्या राजकारणात दोन सदस्य गळाला लावत आ. सत्तारांनी भाजपची सत्ता हिसकावली होती.
आठ वर्षांनंतर या निवडणुका होत असल्याने सर्वच पक्षांच्या प्रस्थापितांसह इच्छुक मोर्चेबांधणी करीत आहे. यात काही गट, गणांत इच्छुकांच्या संख्या वाढल्याने नेत्यांची उमेदवारी देताना दमछाक होणार आहे. भराडी, अंधारी गटात भाजप तर घाटनांद्रा गटात शिवसे-नेकडून इच्छुकांची संख्या अधिक आहे. निवडणुकीची चर्चा इच्छुकांत जोरात सुरु आहे.
या निवडणुकीत भाजप - शिव-सेना अशा मुख्य लढती होणार असल्या तरी महाविकास आघाडीचे उमेदवारही रिंगणात दिसणार आहे. यामुळे तिरंग्या लढतीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांमुळे कुणाचे गणित जुळते अन कुणाचे बिघडते हे निवडणुकीत दिसेल.
प्रतिष्ठेची निवडणूक
आठ वर्षांनंतर निवडणूक होत असल्याने शिवसेना, भाजपसह महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. तर ही निवडणूक जिल्हा परिषद, पंचायत समितीची सत्ता अधोरेखित करणारी असल्याने भाजप- शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची आहे. वर्षभरापूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत अजिंठा, घाटनांद्रा, अंधारी, उंडणगाव गटात आ. अब्दुल सत्तार यांना तर भराडी, पालोद, भवन, शिवणा गटात सुरेश बनकर यांना आघाडी मिळाली होती. तर राज्यात मोठ्या मताधिक्याने विजयी होणाऱ्या नेत्यांमध्ये आपले नाव आघाडीवर असेल अशी वल्गना करणारे आ. सत्तार काठावर पास झालेले आहे. यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठीही प्रतिष्ठेची मानली जात आहे.
केहऱ्हाळा, डोंगरगाव गट चर्चेत
सध्या या निवडणुकीच्या चर्चेत पूर्वीचे भवन तर आताचे केहऱ्हाळा व पू-र्वीचे पालोद तर आताचे डोंगरगाव गट भलतेच चर्चेत आहे. सलग तीन पंचवार्षिकपासून भाजपच्या असलेला केहऱ्हाळा गट हिसकावण्यासाठी शिवसेनेकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरु आहे. तर शिवसेनेला धोबीपछाड देण्यासाठी भाजपचे ज्ञानेश्वर मोठेही गटात तळ ठोकून आहे. डोंगरगाव गटातून कै. माणिकराव पालोदकार यांचे सुपुत्र देविदास पालोदकर शिव-सेनेकडून इच्छुक असल्याने हा गट भलताच चर्चेत आहे. तर नव्याने निर्मिती झालेला अभंई गटात कोण बाजी मारतो, याकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.