

Municipal Corporation's ward structure to be completed by September 4
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा
सर्वोच्च न्यायालयाच्या आदे शानंतर राज्य शासन आणि राज्य निवडणूक आयोग महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने तयारीला लागले आहेत. दोन दिवसांपूर्वीच प्रभाग रचना करण्याचे आदेश दिल्यानंतर गुरुवारी (दि.१२) शासनाच्या नगरविकास विभागाने प्रभाग रचनेच्या प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार ११ जूनपासूनच प्रक्रियेला सुरुवात झाली असून, २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करून अधिसूचना जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे आता महापालिका निवडणुकीची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू झाली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदे शानंतर महापालिका निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे. त्यात राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनंतर राज्य शासनाचा नगरविकास विभागही कामाला लागला आहे. दोन दिवसांपूर्वीच शासनाने छत्रपती संभाजीनगर महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले होते.
परंतु यात प्रभाग रचनेसाठी कधीची लोकसंख्या गृहीत धरायची आणि केव्हापासून प्रक्रिया सुरू करायची व कधीपर्यंत प्रभाग रचना प्रसिद्ध करायची, याबाबत वेळापत्रकच देण्यात आले नव्हते. त्यामुळे महापालिका प्रशासनाला शासनाच्या दुसऱ्या आदेशाची प्रतीक्षा होती. त्यानुसार गुरुवारी (दि.१२) हा आदेश महापालिकेला प्राप्त झाला.
दरम्यान, या आदेशात अ, ब, क आणि ड श्रेणीमध्ये असलेल्या महापालिकांच्या प्रभाग रचना किती दिवसांत पूर्ण करायच्या त्याबाबत सूचना केली आहे. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर महापालिकेला ११ जूनपासून प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार प्रभाग रचनेची प्रक्रिया सुरू झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या प्रभाग रचनेला सुरुवात झाली आहे. २०११ ची लोकसंख्या गृहीत धरली जाणार असून, त्यानुसार आता प्रभागातील मतदार संख्या निश्चित होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
प्रगणक गटाची मांडणी करणे ११ ते १६ जून
प्ररूप प्रभाग रचना तयार करणे ११ ते १६ जून
जनगणनेची प्राप्त माहिती तपासणे १७ ते १८ जून
स्थळपाहणी करणे - १९ ते २३ जून
गुगल मॅपवर नकाशे तयार करणे २४ ते ३० जून
नकाशावर निश्चित केलेल्या प्रभाग हद्दी जागेवर जाऊन तपासणे - १ ते ३ जुलै
रचनेच्या मसुद्यावर स्वाक्षरी करणे - ४ ते ७ जुलै
रचनेचा प्रस्ताव आयोगाला पाठवणे ८ ते १० जुलै
राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या अधिकार्याने प्रारूपला मान्यता देणे - ८ ते १० जुलै
प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करणे व त्यावर हरकती सूचना मागविणे - २२ ते ३१ जुलै
शासन नियुक्त प्राधिकृत अधिकार्याने प्राप्त हरकतींवर सुनावणी घेणे १ ते ११ ऑगस्ट
सुनावणीनंतर अंतिम केलेली प्रभाग रचना निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी पाठवणे १२ ते १८ ऑगस्ट
राज्य निवडणूक आयुक्तांनी अंतिम केलेली प्रभाग रचना महापालिका आयुक्तांना कळवणे - १२ ते १८ ऑगस्ट
राज्य निवडणूक आयुक्तांनी अंतिम केलेली प्रभाग रचना अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करणे २९ ते ४ ऑगस्ट