

Ambadas Danve met MNS leader Prakash Mahajan
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्त-सेवा :
दोन दिवसांपासून प्रकाश महाजन आणि राणे पिता-पुत्र यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले आहे. तर दुसरीकडे ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा जोरात सुरू आहे. या दोन्हींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा पक्षाचे नेते तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बुधवारी (दि.११) मनसे नेते प्रकाश महाजन यांची भेट घेतली. मात्र आमचे वैयक्तिक संबंध असल्याने ही भेट घेतल्याचे दानवे यांनी यावेळी सांगितले.
आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दोन्ही भाऊ एकत्र येणार, अशी चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात जोर धरत आहे. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनीही तसे संकेत दिले. याच दरम्यान मनसे नेते प्रकाश महाजन आणि राणे पिता-पुत्र यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले आहे.
भाजपा नेते नारायण राणे यांच्या कार्यकर्त्यांनी प्रकाश महाजन यांना धमकी दिल्यानंतर महाजन यांनीही दंड थोपटून राणे यांना आव्हान दिले. या सर्व पार्श्वभूमीवर ठाकरे सेनेचे नेते अंबादास दानवे यांनी बुधवारी प्रकाश महाजन यांची भेट घेतली. शिवसेना उबाठा पक्षाच्यावतीने बुधवारी विभागीय आयुक्तालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला.
हा मोर्चा संपताच अंबादास दानवे स्वतः महाजन यांच्या निवासस्थानी गेले होते. अचानक झालेल्या या भेटीमुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. दानवे यांच्या या भेटीमुळे ठाकरे बंधूंमधील जवळीक वाढत असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, दानवे यांनी मात्र ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले. प्रकाश महाजन आणि माझे जुने संबंध आहेत. ते आमचे काका आहेत. त्यांनी राणे यांना दिलेले उत्तर मला आवडले. या वयातही दंड थोपटून त्यांनी आव्हान दिले. त्यांचा आदर्श घ्यायला पाहिजे. नारायण राणे केंद्रात मंत्री होते, त्यांनी असे बोलणे योग्य नाही, असेही दानवे म्हणाले.