

Municipal Corporation's total station survey up to Bhawani Nagar completed
पुढारी वृत्तसेवा : महापालिकेने शहरात रस्ता रुंदीकरण मोहीम सुरू केली आहे. यात आतापर्यंत सहा रस्त्यांवर पाडापाडीची मोहीम राबविण्यात आली असून सोमवारी (दि. ११) चंपा चौक ते जालना रोड या ३० मीटर रस्त्यासाठी महापालिकेने नगरभूमापनच्या कर्मचाऱ्यांसोबत टोटल स्टेशन सर्वेक्षणाला सुरुवात केली. यात सायंकाळपर्यंत चंपा चौक ते भवानीनगरपर्यंत मोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली. यात शेकडो मालमत्ता बाधित होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यापैकी जिन्सीपर्यंतच्या अनेक मालमत्ताधारकांनी यापूर्वीच टीडीआर स्वरुपात मोबदला घेतल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
चंपा चौक ते जालनारोड या विकास आराखड्यातील ३० मीटर मंजूर रस्त्यासाठी यंदा महापालिका प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहे. शहराच्या विविध भागांतून जालना रोडशी कनेक्टिव्हिटी वाढविण्यात आहे. या रस्त्यासाठी महापालिकेने यापूर्वी देखील भूसंपादनाची प्रक्रिया राबविली होती. त्यात चंपा चौक ते जिन्सीपर्यंत अनेक मालमत्ताधारकांनी टीडीआर स्वरुपात मोबदला घेतला आहे. तर काहींचे अर्ज अजूनही महापालिकेकडेच पडून आहे. मात्र, भवानीनगर ते जालना रोडदरम्यान बाधित मालमत्तांमध्ये घरांचा समावेश आहे. यातील जवळपास सर्वच मालमत्ताधारकांनी रोख अथवा जागेच्या बदल्यात जागा देण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, महापालिकेने सोमवारी (दि. ११) टोटल स्टेशन सर्वेक्षणला सुरुवात केली आहे. यावेळी नगरभूमापन विभागाचे कर्मचारीदेखील सहभागी होते. परंतु, महापालिकेच्या मोजणीनंतर नगरभूमापनची मोजणी होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. महापालिकेने चंपा चौक ते जिन्सी आणि पुढे भवानीनगरपर्यंत टोटल स्टेशन सर्वेक्षणांतर्गत मोजणीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. मंगळवारीदेखील हीच प्रकिया पुढे जालना रोडपर्यंत केली जाणार असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. भवानीनगरपर्यंत सुमारे ५०० हून अधिक मालमत्तांचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दोन दिवसाने नगरभूमापनची मोजणी
महापालिकेने सोमवारी चंपा चौक ते जालना रोडसाठी टोटल स्टेशन सर्वेक्षण सुरू केले. यात भवानीनगरपर्यंत मोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या टोटल स्टेशन सर्वेक्षणाचा अहवाल दोन दिवसांत महापालिका नगरभूमापन विभागाला देईल. त्यानंतर नगरभूमापन विभागाद्वारे मोजणी केली जाणार आहे. त्यात नेमक्या किती मालमत्ता बाधित होतील, याची माहिती पुढे येईल, असे नगरभूमापन विभागाद्वारे सांगण्यात आले आहे.