

Paithan Siddheshwar Mahadev temple robbery
पैठण: श्रावण सोमवार निमित्त पंचक्रोशीतील महादेव मंदिरांत दर्शनासाठी मोठी गर्दी झाली असताना, महिला भाविकांवर पाळत ठेवून दागिने लुटणाऱ्या नकली पोलीस चौकडी टोळीतील एकाला नागरिकांनी पकडून चांगलाच चोप देत पोलिसांच्या हवाली केले.
मिळालेल्या माहितीनुसार, पैठणजवळील सिद्धेश्वर महादेव मंदिरात सोमवारी पहाटेपासून महिला भाविकांची मोठी रांग होती. पाटेगाव येथील विठ्ठल डोंगरे हे पत्नीसमवेत दर्शन करून परत जात असताना, मोटारसायकलवरून आलेल्या चार अनोळखी तरुणांनी त्यांना अडवले. "आम्ही पोलिस आहोत, चोरीच्या घटना वाढल्या आहेत. दागिने तपासणीसाठी काढा, आम्ही सुरक्षित पॅकमध्ये बांधून देतो," असे त्यांना सांगितले.
यावेळी, डोंगरे यांच्या हातातील सोन्याची अंगठी व पत्नीच्या गळ्यातील पोत कागदाच्या पुडीत बांधण्याचे नाटक करून ते पळून जात होते. मात्र, भाविक दाम्पत्याने आरडाओरड केली. नागरिकांनी पाटेगाव पुलाजवळ चोरट्यांचा पाठलाग केला. त्यात तीन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले, पण एकाला मोटारसायकलसह पकडण्यात आले. त्याला नागरिकांनी चांगलाच चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले.
यावेळी लुटलेली सोन्याच्या दागिन्यांची पुडीही पोलिसांनी जप्त केली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस निरीक्षक महादेव गोमारे, पोलीस उपनिरीक्षक संभाजी खाडे, बीट जमादार रावसाहेब आव्हाड, फरताळे, शिंदे, खिळे, होमगार्ड अशोक खेडकर व राजू कोटरवाल यांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेतले. या प्रकरणी पैठण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे.