

Municipal Corporation's functioning in the spotlight over the naming of parks, roads, and squares
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नव्या नामकरणाच्या प्रस्तावांना मंजुरी देताना संबंधित ठिकाणांचे यापूर्वीच नामकरण झाल्याची बाब समोर आल्याने मनपाच्या कारभाराची चांगलीच चर्चा रंगली आहे. २५ ऑगस्टच्या सभेत सम्राटनगरातील खुल्या जागेला स्वामी विवेकानंद उद्यान, तर एमआयटी कॉलेज चौकाला डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक असे नाव देण्याचे प्रस्ताव मंजूर झाले. मात्र, या दोन्ही ठिकाणांना २०१९ मध्येच नावे देण्यात आली आहेत. त्यामुळे आता अधिकृत नाव नेमके कोणते, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
महापौरांनीही प्रस्तावाला मंजुरी दिली. मात्र, १८ जुलै २०१९ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत याच जागेचे माँ साहेब मिनाताई ठाकरे उद्यान असे नामकरण करण्यात आले होते. विशेष म्हणजे, त्यावेळी प्रस्ताव मांडणारे सिद्धांत शिरसाट आणि शिल्पाराणी वाडकर हे दोन्ही नगरसेवक सध्या सभागृहात आहेत. तसेच याच सभेत कुलकर्णी आणि राजपूत यांनी एमआयटी कॉलेज चौकाला डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मांडला.
प्रत्यक्षात या चौकाचे यापूर्वीच राजमाता अहिल्याबाई होळकर चौक व मार्ग असे नामकरण करण्यात आले आहे. त्यावेळी विजय वाघचौरे, राजू वैद्य, सूर्यकांत जायभाये आणि साधना सुरडकर यांनी नामकरणाचा प्रस्ताव मांडला होता. दरम्यान, साडेपाच वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर महापालिकेत भाजपची सत्ता आली आहे.
विकासकामांना वेग येईल, अशी अपेक्षा असताना सर्वसाधारण सभेत चौक, रस्ते आणि उद्यानांच्या नामकरणाचे प्रस्ताव मोठ्या प्रमाणावर येत आहेत. मात्र, आधीच नामकरण झालेल्या ठिकाणांवर पुन्हा नव्या नावांचे प्रस्ताव मंजूर झाल्याने मनपाच्या नामकरण प्रक्रियेतील समन्वय आणि नोंदवहीवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.