

Municipal Corporation spends ₹54 lakh annually on attendance app
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेतील कायमस्वरूपी व कंत्राटी कर्मचाऱ्यांची हजेरी नोंदविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अॅपवर महापालिकेचा वर्षाला तब्बल ५४ लाख रुपयांचा खर्च होत आहे. मागील दोन वर्षांपासून खासगी एजन्सीमार्फत ही सेवा सुरू असून मंगळवारी (दि. २५) झालेल्या सर्वसाधारण सभेत या सेवेसाठी एक कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकीय खर्चास मंजुरी देण्यात आली. मात्र, पुढील काळासाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्याचे आदेश सभेने प्रशासनाला दिले.
महापालिकेने यापूर्वी कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी थम इम्प्रेशन मशीन बसविली होती. त्यानंतर स्मार्ट फेस रिडींग यंत्रणाही वापरण्यात आली. या दोन्ही प्रयोगांवर लाखो रुपये खर्च झाले. आता मात्र मोबाईलवर फोटो काढून हजेरी नोंदविणाऱ्या अॅपचा वापर सुरू आहे. दरम्यान, दोन वर्षांपूर्वी एम.एस. व्हेंचर्स प्रा. लि. या खासगी एजन्सीने तयार केलेले अॅप महापालिकेने स्वीकारले.
नियमित निविदा न काढता ६७-३ (क) या आणीबाणीच्या तरतुदीखाली एजन्सीची नियुक्ती करण्यात आली. या अॅपमध्ये कायम आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांची माहिती नोंदविण्यात आली असून, प्रत्येक कर्मचाऱ्याचे नियुक्तीचे ठिकाण निश्चित करण्यात आले आहे. तसेच कर्मचाऱ्यांना सकाळी व संध्याकाळी नियुक्तीच्या ठिकाणी मोबाईलवरून फोटो काढून हजेरी नोंदवावी लागते.
त्यानंतर महिनाअखेरीस एजन्सीकडून तयार केलेले हजेरीपत्रक आस्थापना विभागाकडे दिले जाते. पडताळणीनंतर ते लेखा विभागाकडे पाठविले जाते आणि त्यानुसार वेतन काढले जाते. या हजेरी अॅपच्या सेवेसाठी महापालिका प्रत्येक कर्मचाऱ्यामागे दररोज १ रुपया ९७ पैसे अदा करते. त्यामुळे महिन्याला सुमारे साडेचार लाख रुपये आणि वर्षाला तब्बल ५४ लाख रुपये खर्च होतो.
एक कोटीच्या तरतुदीला मंजुरी
सर्वसाधारण सभेत हजेरी अॅपच्या अंदाजपत्रकीय खर्चाला मंजुरी देण्यात आली. या कामासाठी एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, पुढील नियुक्ती निविदा प्रक्रियेतून करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले.