

Municipal Corporation has made a provision of Rs 160 crore for service roads.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
महापालिका जालना रोड, पैठण रोड, जळगाव रोड, बीड बायपास आणि दौलताबाद रोडवर सर्व्हिस रोड करणार आहे. त्यासाठी सध्या ६० मीटर रुंदीतील बेकायदा बांधकामे पाडण्यात येत असून, या रस्त्यांच्या कामासाठी प्रशासनाने १६० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यातील ६० कोटी शासनाकडून तर शंभर कोटी महापालिका निधीतून उपलब्ध होतील, असे अतिक्रमण विभागाचे प्रमुख अतिरिक्त आयुक्त तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी संतोष वाहुळे यांनी सांगितले.
महापालिकेतर्फे शहरातील प्रमुख रस्त्यांवर ६० मीटर रुंदीतील बेकायदा बांधकामांवर प्रशासनाने बुलडोझर कारवाई सुरू केली आहे. या ६० मीटरपैकी दोन्ही बाजूंनी १२-१२ मीटर रुंदीचे सर्व्हिस रोड तयार करण्यात येणार आहे.
महापालिका प्रशासन अतिक्रमणे हटविण्याची कारवाई करते आणि त्यानंतर निधी नसल्याचे कारण पुढे करून रस्त्याचे काम लांबणीवर टाकते. याप्रकारामुळे पुन्हा पाडलेली अतिक्रमणे हळूहळू जैसे थे होतात.
त्यामुळे यंदातरी पाडापाडीनंतर महापालिका लगेचच रस्त्याच्या कामाला सुरुवात करणार आहे का, असा सवाल अनेक जण उपस्थित करीत आहेत. त्याबाबत पत्रकारांशी औपचारिक गप्पा मारताना अतिक्रमण हटाव विभागाचे प्रमुख अतिरिक्त आयुक्त तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी वाहुळे म्हणाले, यंदा महापालिका पूर्ण तयारीने मोहीम राबवत आहे.
प्रशासक जी. श्रीकांत यांनी संपूर्ण नियोजन केले आहे. यात महापालिकेच्या फंडातून १०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तर शासनाकडून ६० कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. त्यासाठी शासनाला प्रस्तावही दिला असून त्यास मंजुरी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.