

Municipal Corporation cracks down on encroachments at Sambhajipeth vegetable market
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा दिवाळीनंतर अतिक्रमण हटविण्याचा दिलेला शब्द अखेर महापालिकेने पाळला असून गुरूवारी (दि.२६) संभाजीपेठ भाजीमंडई परिसरात सकाळी अतिक्रमणविरोधी पथकाने कारवाई करीत रस्त्यालगत उभारलेले १२ फयांचे शेड आणि एक लोखंडी कमान हटविली. या कारवाईवेळी ११ हातगाड्यांसह अतिक्रमणाचे साहित्य जप्त करून हसूल तलाव परिसरातील फिल्टर बेड येथे जमा केले. या कारवाईमुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने २३ नोव्हेंबरपासून जुन्या शहरातील बाजारपेठांमध्ये अतिक्रमण हटविण्याची घोषणा केली होती. त्यानुसार तयारीही करण्यात आली होती. मात्र, ऐनवेळी शहरात मोर्चा आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे आगमन असल्याने पोलिसांनी बंदोबस्त देण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे नियोजित कारवाई पुढे ढकलावी लागली होती.
दरम्यान, दिवाळीपूर्वीच अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू करण्याचे नियोजन होते. मात्र, महापालिका पदाधिकारी आणि व्यापाऱ्यांच्या विनंतीवरून आयुक्त अमोल येडगे यांनी दिवाळीनंतर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते.
त्यानुसार गुरुवारी संभाजीपेठेतील भाजीमंडईपासून मोहिमेला सुरुवात करण्यात आली. ही कारवाई नियमितपणे सुरू राहणार असल्याने अतिक्रमणधारकांनी स्वतःहून अतिक्रमणे हटवावीत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. ही कारवाई मुख्य अतिक्रमण नियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त सविता सोनवणे, सहायक आयुक्त संजय सुरडकर, इमारत निरीक्षक सुंदर खरात, रवींद्र देसाई, अशोक कदम आदींनी केली.