

350 employees participate in strike; operations in academic and examination departments come to a standstill
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सेवेत असलेल्या सर्व ३५५ कर्मचाऱ्यांनी गुरुवारी (दि.२६) लेखणी बंद आंदोलनात सहभाग घेतला. दिवसभरात त्यामुळे परीक्षा, लेखा, शैक्षणिक अकॅडमिक, पदव्युत्तर व पीएचडी विभागाचे कामकाज ठप्प झाले.
विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे राज्य कार्यध्यक्ष डॉ. कैलास पाथ्रीकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधान दिनानिमित्त उद्देशिकेचे वाचन करून आंदोलनास सुरुवात झाली. महात्मा फुले पुतळ्यासमोरील हिरवळीवर कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. सकाळी साडे दहा ते साडे पाच या दरम्यान आंदोलन झाले.
यावेळी राज्य शासनाने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सापतन वागणूक दिल्याचा आरोप करत आगामी काळात राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी डॉ. कैलास पाथ्रीकर यांनी दिला.
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या या लेखनी बंद आंदोलनास कुलगुरू डॉ. विजय फुलारी, कुलसचिव डॉ. संजय कवडे, डॉ. अंकुश कदम यांनी भेट दिली. कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही यावेळी दिली.