

Municipal Corporation claims 90 percent drain cleaning, garbage including silt remains on the banks
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मान्सूनपूर्व नालेसफाईचे ९० काम पूर्ण झाल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात येत असला, तरी प्रत्यक्षात अनेक भागांमध्ये नाल्यातून काढलेला गाळ आणि कचरा कडेलाच पडून असल्याचे चित्र समोर आले आहे. आगामी पावसाळ्यात हा गाळ पुन्हा नाल्यात वाहून जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने पूरस्थितीचा धोका कायम राहणार असल्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहेत.
महापालिकेच्या यांत्रिकी विभागामार्फत विविध झोन कार्यालयांच्या माध्यमातून शहरातील प्रमुख नाल्यांची साफसफाई सुरू आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार सुमारे ९० टक्के नालेसफाई पूर्ण झाली आहे. तसेच पावसाळ्यापूर्वी आवश्यक उपाययोजना राबविण्यात येत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
हवामान विभागाने जूनच्या सुरुवातीपासून मराठवाड्यासह छत्रपती संभाजीनगरमध्ये मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज वर्तविल्याने नालेसफाईच्या कामांना वेग देण्यात आला आहे. मात्र शहरातील अनेक भागांमध्ये नाल्यातून पातून बाहेर काढलेला गाळ, प्लास्टिक कचरा आणि झाडाझुडपांचे ढिगारे नाल्यांच्या शेजारीच टाकण्यात आले आहेत. उन्हाळ्यात कोरडे असलेले हे ढिगारे पावसाच्या पाण्यासोबत पुन्हा नाल्यात मिसळण्याची शक्यता असल्याने साफसफाईचा उद्देशच अपूर्ण राहण्याची भीती व्यक्त होत आहे. तर काही भागांत दुर्गंधी आणि डासांचे प्रमाण वाढल्याच्या तक्रारीही नागरिकांकडून करण्यात येत आहेत.
नदीकाठच्या वस्त्यांमध्ये वाढली चिंता
खाम नदी आणि सुखना नदीलगतच्या वस्त्यांमध्ये दरवर्षी पावसाळ्यात पाणी शिरण्याच्या घटना घडतात. नाल्यांमध्ये पुन्हा गाळ साचल्यास पाण्याचा निचरा मंदावून नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. शहरातील अनेक नाल्यांवरही पाणी साचण्याच्या समस्या कायम असल्याने नागरिक चिंतेत आहेत.
गाळ तातडीने हटविण्याची मागणी
सफाईदरम्यान नाल्याबाहेर काढलेला गाळ तत्काळ हटवून त्याची योग्य विल्-हेवाट लावावी, अशी मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे. केवळ नाले साफ करून उपयोग नसून गाळ हटविणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पावसाळ्यापूर्वी प्रभावी उपाययोजना न झाल्यास पहिल्याच जोरदार पावसात शहरातील अनेक भागांत पुन्हा पाणी साचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.