

Chairman Inspects Drains from Moti Karanja to Samarthnagar
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील मोती कारंजा ते समर्थनगर मार्गे संभाजी पेठपर्यंतच्या नाल्यांची तातडीने संपूर्ण स्वच्छता करण्याचे निर्देश गुरुवारी (दि.७) स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी दिले. यावेळी त्यांनी नाल्यावरील अतिक्रमणे हटविण्यासह पाणी साचणार नाही यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना केल्या असून नाल्यांवरील इमारतधारकांनी तातडीने नाल्यांतील कचरा साफ करावा, अन्यथा महापालिकेकडून कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला. यात शिवसेनाभवनसह सर्व संबंधित इमारतमालकांना सोमवारपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील नाल्यांच्या साफसफाईची कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी महापालिकेकडून हालचालींना वेग देण्यात आला आहे. शहरातील नालेसफाईची पाहणी करण्यासाठी सभापती अनिल मकरिये यांनी गुरुवारी सकाळी आठ वाजता मोती कारंजा परिसरातून प्रत्यक्ष पाहणी दौऱ्याला सुरुवात केली.
यावेळी त्यांनी गांधीनगर, चुनाभट्टी, फकीरवाडी, औषधी भवन मार्गे संभाजी पेठपर्यंत नाल्यालगत पायी फेरफटका मारत परिस्थितीची माहिती घेतली. प्रत्येक ठिकाणी थांबून संबंधित अधिकाऱ्यांना कामांची गती वाढविण्याचे आदेश दिले. तसेच मोती कारंजा ते संभाजीपेठ व पुढे वरद गणेश मंदिर आणि समर्थनगरपर्यंतच्या नाल्यांची साफसफाई येत्या सोमवारपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
दरम्यान पावसाळ्यात नाल्यांमध्ये पाणी साचणार नाही तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, यासाठी विशेष दक्षता घेण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. या पाहणीवेळी अतिरिक्त शहर अभियंता अनिल तनपुरे, यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल कुलकर्णी, प्रभाग-२ चे सहाय्यक आयुक्त रमेश मोरे, प्रभाग-१ च्या लता पुजारी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
नाल्यावरील अतिक्रमण हटविणार
नाल्यांच्या काठावर करण्यात आलेली अतिक्रमणे तातडीने हटविण्याचे स्पष्ट निर्देश सभापती मकरिये यांनी दिले आहेत. तसेच रस्त्यांलगत दुकानांबाहेर ठेवण्यात आलेले फलक, स्टैंडीज व इतर साहित्य दुकानांच्या हद्दीतच ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. नियमांचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला..
मनपाच्या बंद शाळेची पाहणी
पाहणी दौऱ्यात सभापती मकरीये यांनी अतिक्रमण कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित असले तरी नियमभंग सहन केला जाणार नाही, असे स्पष्ट करत कारवाईचा इशारा दिला. यादरम्यान, त्यांनी मोतीकारंजा परिसरातील महानगरपालिकेच्या बंद शाळेचीही पाहणी केली. सुमारे एक एकर जागा निष्क्रिय अवस्थेत असल्याने त्या ठिकाणी आरोग्य केंद्र सुरू करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्याची माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.