

जालना : गत वर्षी शहरातील अनेकांच्या घरात नाल्याचे पाणी शिरले होते. नागरिकांची बेफिकिरी आणि प्रशासनाची उदासिनता यामुळे नाल्यात सर्रासपणे प्लॅस्टिकसह इतर वस्तू टाकल्याने नाले तुंबल्या जाते.
परिणामी, नाले तुंबल्याने नाल्यातील घाण पाणी पाऊस पडल्यानंतर रस्त्यावर येवून वाहते. या बाबीला आला घालण्यासाठी शनिवार, दि. 2 पासून मान्सूनपूर्व नालेसफाई करण्याची मोहिम महानगर पालिकेने हाती घेतली आहे. शहरातील प्रमुख नाल्यांची युद्धपातळीवर सफाई करण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, आगामी पावसाळ्यात शहरात पाणी साचू नये, नाल्यांमध्ये अडथळे निर्माण होऊ नयेत आणि सार्वजनिक आरोग्य सुरक्षित राहावे, यासाठी जालना शहर महानगरपालिकेने पावसाळ्यापूर्व नालेसफाई मोहिमेला वेग दिला आहे. सध्या युद्धपातळीवर राबविण्यात येत असून शहरातील प्रमुख नाल्यांची यंत्रसामग्रीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर साफसफाई केली जात आहे.
प्रशासकीय नियोजनानुसार, शहरातील सर्व प्रमुख नालेसफाईची कामे 25 मे पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पावसाळ्यात निर्माण होणारी पूरस्थिती, रस्त्यांवरील पाणी साचणे आणि दूषित वातावरणामुळे उद्भवणारे आजार टाळण्यासाठी ही मोहीम महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
दरम्यान, स्वच्छतेसंदर्भातील तक्रारींसाठी नागरिकांनी प्रथम संबंधित प्रभागातील स्वच्छता निरीक्षकांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तक्रारींचे निराकरण न झाल्यास स्वच्छता विभाग प्रमुख निलेश शंकरपेल्ली आणि आरोग्य व स्वच्छता समितीचे सभापती कपिल भुरेवाल यांच्याशी संपर्क साधण्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
महापौर वंदना मगरे आणि उपमहापौर राजेश राऊत यांनी नागरिकांना पावसाळ्यातील समस्या टाळण्यासाठी मनपाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. यंदाच्या पावसाळ्यात नालेसफाईची काळजी घेतली जाईल, असे मनपा प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.
या भागातील नाल्यांवर विषेश लक्ष
महानगरपालिका प्रशासनाने भोईपुरा नाला, पांगारकर नगर-यशवंत नगर परिसर नाला, कन्हैय्या नगर नाला, स्नेहल नगर नाला आणि वाल्मीक नगर नाला या प्रमुख नाल्यांच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. नाल्यात साचलेला गाळ, प्लास्टिक व कचरा उपसून पाण्याचा निचरा सुरळीत करण्यासाठी कर्मचारी आणि यंत्रणा कार्यरत आहेत.
नागरिकांनी सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळावा. ओला व सुका कचरा वेगळा करूनच घंटागाडीत टाकावा. कचऱ्याचे वर्गिकरण केल्याने कचऱ्याची विल्हेवाट योग्य प्रकारे लावल्या जाते.
अंजली शर्मा, आयुक्त, मनपा जालना शहर.