

Municipal Corporation awaits notification of SC, ST reservation
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासनाने चार वाँडाँचा एक प्रभाग यानुसार प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याचे काम पूर्ण केले आहे. आता प्रशासनाला एस.सी, एसटीचे आरक्षण किती ठेवायचे, याबाबत राज्य शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. ही माहिती प्राप्त होताच प्रशासन वेळेत शासनाला प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव सादर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यासाठी आणखी दोन आठवड्यांचा अवधी शिल्लक असल्याचेही यंत्रणांकडून सांगण्यात येत आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदे शानुसार शासनाच्या नगरविकास विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रत्येक महापालिका, नगरपालिकांना प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश जारी केले आहेत. मात्र त्यासाठी पाठवलेल्या पहिल्या आदेशात वेळापत्रकच नमूद नव्हते.
त्यामुळे प्रशासनाला दुसऱ्या आदेशाची प्रतीक्षा करावी लागली होती. जेव्हा दुसरा सुधारित आदेश जारी झाला. त्या वेळापत्रकानुसार महापालिकेने प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याच्या कामाला सुरुवात केली.
शासनाने दिलेल्या वेळेच्या आत प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याच्या दृष्टीने महापालिकेने कामकाज केले. त्यानुसार वेळेच्या अगोदर प्रारूपचे काम पूर्ण केले. मात्र या प्रभागांपैकी किती प्रभाग अनुसूचित जाती आणि किती प्रभाग अनुसूचित जमातींसाठी राखीव ठेवायचे, याबाबत शासनाने सुधारित आदेशातही कुठल्याच सूचना प्रशासनाला दिल्या नाही. त्यामुळे प्रशासनला पुन्हा तिसऱ्या आदेशाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
शासनाने सुधारित आदेशात प्रारूप प्रभाग रचना तयार करण्यासाठी विविध टप्प्यांच्या कामांसाठी निश्चित वेळा ठरवून दिल्या आहेत. त्यानुसार प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव तयार करून तो नगरविकास विभागाला सादर करण्यासाठी १ ते ५ ऑगस्टचा वेळ दिला आहे. मात्र त्यापूर्वी आरक्षण नमूद करून प्रस्ताव तयार करावा लागणार आहे.