

Bhumreen's driver was given another reward of Rs 350 crore, Imtiaz Jaleel alleges
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्याचे खासदार संदीपान भुमरे यांचे ड्रायव्हर जावेद रसूल शेख यांच्या १५० कोटी रुपये किमतीच्या जमीन खरेदीचे प्रकरण ताजे असतानाच आणखी एक ३५० कोटी रुपये किमतीच्या ६ एकर इनामी जमिनी भेट दिल्याचे प्रकरण उघडकीस आणले आहे. हैदराबादचे सालारजंग कुटुंबातील वंशजापैकी एक मीर महेमूद अली खान बशारत अली खान यांनी या दोन्ही सुमारे ५०० कोटी रुपये किमतीच्या जमिनी केवळ ५०० रुपयांच्या बॉण्डवर हिबानामा करून दिल्या.
यात तब्बल ६ कोटी रुपयांचा शासकीय मुद्रांक शुल्कही बुडविण्यात आल्याचा आरोप माजी खासदार इम्तियाज जलील यांनी गुरुवारी (दि. १७) पत्रकार परिषदेत केला. एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी याबाबत गुरुव-खरेदीचेारी दुपारी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. ते म्हणाले कोट्यवधी रुपयांची जमीन खासदार भुमरे यांच्याच ड्रायव्हरला सालारजंग यांचे वंशज केवळ ५०० रुपयांच्या बॉण्डवर भेट म्हणून देतात हे संशयास्पद आहे.
ही जमीन खासदार-आमदार पितापुत्रांनी ड्रायव्हरचे नाव पुढे करून हडपल्याचा आरोपही जलील यांनी पत्रकार परिषदेत केला. या दोन्ही जमिनी शहरातील जालना रोडवर बागशेरजंग (दाऊदपुरा) परिसरात आहेत. यात एक सीटीएस नंबर १४८४४-ब असून, तिचे क्षेत्र अडीच एकर आहे.
तर दुसरीचा सीटीएस नंबर १४८४४ अ असून, तिचे क्षेत्र ६ एकर एवढे आहे. या दोन्ही जागांचे (जमिनीचे) सरकारी मूल्य अनुक्रमे ३६ कोटी ३८ लाख ७८ हजार ८६९ रुपये व ८७ कोटी १५ लाख ४५ हजार ६७५ रुपये आहे. तर बाजारमूल्य हे तब्बल ५०० कोटी रुपये आहे. या दोन्ही जमिनींचा हिवानामा हा ५०० रुपयांच्या बॉण्ड पेपरवर करण्यात आला आहे.
या जमिनी खरेदीच्या प्रकरणावर वाद होऊ नये यासाठी हिबानामा होताच तातडीने पीआर कार्डसाठी प्रयत्न केले गेले. त्यासाठी सातबाऱ्यावर नोंद घेऊन संपूर्ण प्रक्रिया जलदगतीने करण्यात आली. नगरभूमापनचे परिरक्षण भूमापक अधिकारी अनिल रूपेकर यांनी युद्धपातळीवर प्रयत्न करून पीआर कार्ड तयार करून दिल्याचे आरोपही इम्तियाज जलील यांनी केले. यात नगरभूमापक दाणेकर यांनी नकार दिला होता. त्यांच्यावर दबाव टाकण्यात आल्याचेही ते म्हणाले.
खासदार संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरला भेट म्हणून मिळालेल्या दीडशे कोटी रुपये किमतीच्या अडीच एकर जमिनीची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे. अद्याप यात कुठलीच माहिती पुढे आली नाही. त्यात हे आता पुन्हा एक प्रकार पुढे आल्याने हा कोट्यवधींचा जमीन घोटाळा प्रकरण असल्याचा दावाही माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केला.