Municipal Commissioner inspects the 'Swachh Survekshan' campaign
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : स्वच्छ सर्वेक्षण २०२६च्या तयारीला वेग देत शहरातील स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी शुक्रवारी (दि. १९) पडेगाव येथील माजी सैनिक कॉलनी व तारांगण सोसायटी परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधून घरगुती कचऱ्याचे वर्गीकरण करूनच तो घंटागाडीत सुपूर्द करण्याचे आवाहन केले.
प्रभाग क्रमांक ४ मधील पाहणीदरम्यान परिसरातील स्वच्छतेची सद्यस्थिती, कचरा संकलन व्यवस्था आणि घनकचरा व्यवस्थापनाच्या अंमलबजावणीचा शुक्रवारी आढावा घेण्यात आला. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त नंदकिशोर भोंबे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी नागरिकांना मार्गदर्शन करताना आयुक्त येडगे यांनी स्वच्छ शहर उभारण्यासाठी नागरिकांचा सहभाग अत्यावश्यक असल्याचे सांगितले.
सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, कचरा जाळणे किंवा परिसर अस्वच्छ ठेवणे यामुळे शहराच्या स्वच्छतेवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. या पाहणीदरम्यान नागरिकांनीही स्वच्छता मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद देत परिसर स्वच्छ आणि सुंदर राखण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याची भूमिका व्यक्त केली. तसेच घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना
आवश्यक सूचना देण्यात आल्या. तसेच आयुक्त येडगे यांनी घंटागाडी वेळापत्रकानुसार ठिकठिकाणी पोहचते की नाही, याचाही आढावा घेतला. यात जीपीएस प्रणालीद्वारे सुमारे ९५ टक्के गाड्या या वेळेत दाखल होत असल्याचे दिसून आले.
आयुक्तांकडून माझा कचरा, माझी जबाबदारीचा मंत्र
प्रत्येक नागरिकाने माझा कचरा, माझी जबाबदारी ही संकल्पना अंगीकारणे गरजेचे असल्याचे आयुक्त अमोल येडगे यांनी सांगितले. घराघरांत कचरा वर्गीकरणाची सवय रुजल्यास घनकचरा व्यवस्थापनाची प्रक्रिया अधिक सुलभ व परिणामकारक होईल. स्वच्छ सर्वेक्षण २०२६मध्ये छत्रपती संभाजीनगरला अग्रक्रमाचे स्थान मिळवून देण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयुक्त येडगे यांनी केले.