

Muncipal Election Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
हिंदुत्वाचे मारेकरी छत्रपती संभाजीनगरात हातपाय पसरत आहेत. ही आपल्या सगळ्यांसाठी धोक्याची घंटा आहे. संभाजी महाराजांचा घात घरभेद्यांनी केला. आता संभाजीनगराचा घात करण्यासाठी खोट्या हिंदुत्वाचा बुरखा घालून काही घरभेदी इकडे आले आहेत. त्यांच्या नांग्या ठेचा, असे आवाहन शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी (दि. ११) जाहीर सभेत केले.
महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी रविवारी टीव्ही सेंटर येथील मैदानावर एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा पार पडली. व्यासपीठावर पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, आमदार प्रदीप जैस्वाल, रमेश बोरणारे, विलास भुमरे, संजना जाधव, संपर्कप्रमुख पारकर, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, किशनचंद तनवाणी यांच्यासह पक्षाचे उमेदवार उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, शहराचे नामांतर छत्रपती संभाजीनगर झाल्यानंतरची महापालिकेची ही पहिली निवडणूक आहे. आतापर्यंत औरंगाबादचे महापौर असे आपण म्हणायचो, पण आता पहिल्यांदाच छत्रपती संभाजीनगरचा महापौर या ठिकाणी निवडून येणार आहे. त्यामुळे तो शिवसे-नेचाच बसणार आहे. ज्याने नामांतराला विरोध केला, त्या रशीद मामूला उबाठाने तिकीट दिले. त्यांना तुम्ही मत देणार का, उठाबशा काढणारे आता मुंबईच्या बाहेर पडायला तयारच नाहीत.
मुंबई सोन्याचे अंडी देणारी कोंबडी आहे म्हणून त्यांनी सगळ्या महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडले आहे, अशा शब्दांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. आपण २०२२ ला हिंमत दाखविली आणि तख्ता पलट करून टाकला. लोकसभा, विधानसभेत यश मिळविले. नगरपरिषदेतही कमी जागा लढवून आपले ७० नगराध्यक्ष निवडून आले. आता सांगा खरी शिवसेना कोणाची. आपल्याला नकली शिवसेना म्हणतात. तुम्ही बाळासाहेबांचे हिंदुत्व सोडले, त्याच वेळी तुम्ही नकली झालात, असा टोलाही शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
पतंग कटली, आता त्यांची वाट लागली
एकनाथ शिंदे यांच्या भाषणात आकाशात उडणारा एक पतंग कटून खाली आला. त्याचा उल्लेख करीत शिंदे यांनी पतंग कटली, आता त्यांची वाट लागली, असे सांगत एमआयएमच्या ओवैसी आणि इम्तियाज जलील यांच्यावरही जोरदार टीका केली. ओवैसीच्या पार्टीला गाडून टाकण्याची संधी या निवडणुकीत तुमच्या हातात आली आहे. त्यांना गाडून टाका, असे आवाहन शिंदे यांनी केले. आधी काँग्रेसने आणि नंतर स्थगिती सरकारने या शहराचा विकास रोखला. महाविकास आघाडीने मुंबईप्रमाणेच संभाजीनगरातही भ्रष्टाचाराची पेरणी केली. त्यामुळे पाणीप्रश्न सुटला नाही, असा आरोपही शिंदे यांनी केला.
शिवसेनेचाच महापौर बसणार
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. संभाजीनगरात शिवसेना स्वबळावर लढते आहे, पण आपले शिवसैनिक लढाऊ आहेत. इथे समोर जमलेली गर्दी पाहून मला खात्री पटली आहे की, इथे शिवसेनेचाच महौपार बसल्याशिवाय राहणार नाही, असे शिंदे म्हणाले.