

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील एकमेव मनपाचे प्राणिसंग्रहालय हे पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनले आहे. प्राण्यांना पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी ओसंडून वाहत आहे. दररोज साधारणपणे दीड लाख रुपये, तर रविवारी साधारण-पणे दोन ते तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळत असून, डिसेंबरपर्यंत २ कोटी ४ लाख रुपयांचे उत्पन्न प्राणिसंग्रहालयाला झाले आहे. डिसेंबर अखेरपर्यंत ४ लाख ७७हजार पर्यटकांनी प्राणिसंग्रहालयाला भेट दिली आहे.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे प्राणिसंग्रहालय मराठवाड्यातील एकमेव प्राणिसंग्रहालय आहे. हे प्राणिसंग्रहालय पाहण्यासाठी दरर-ोज हजारो पर्यटक येतात. सिद्धार्थ उद्यानात फिरल्यानंतर प्राणिसंग्रहालयात जाऊन प्राण्यांना पाहण्याचा मनसोक्त आंनद लुटतात. मनपाच्या प्राणिसंग्रहालयात सिंह, वाघ,विबट, अस्वल, हरणे, काळवीट, निलगाय, सांबर, माकड, शहामृग, कोल्हा, लांडगा, मगर हे प्राणी आहेत. हे प्राणी दंगामस्ती करताना मोबाईलमध्ये छबी टिपण्यासाठी गर्दी होते. प्राणी संग्रहालयात पर्यटकांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा, बसण्यासाठी पत्र्याचे शेड, स्वच्छतागृह आदी व्यवस्था आहेत. हे प्राणिसंग्रहालय पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनले आहे.
मागील वर्षी ३ कोटी १४ लाखांचे उत्पन्न
आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये प्राणिसंग्रहालयाला एकूण ३ कोटी १४ लाख ३१ हजार ४३० रुपये उत्पन्न मिळाले. या कालावधीत तब्बल ५ लाख ४२ हजार ११२ पुरुष व महिला आणि २ लाख २० हजार ८६६ मुले-मुलींनी प्राणिसंग्रहालयाला भेट दिली. तसेच ८५१ कॅमेऱ्यांद्वारे छायाचित्रण शुल्काची वसुली करण्यात आली. डिसेंबर २०२४ व जानेवारी २०२५ हे महिने सर्वाधिक गर्दीचे ठरले.
डिसेंबरपर्यंत २ कोटी ४ लाखांची वसुली
२०२५-२६ या आर्थिक वर्षात डिसेंबर २०२५ पर्यंत प्राणिसंग्रहालयाने २ कोटी ४ लाख ७७ हजार ३३० रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. या कालावधीत ३ लाख ६२ हजार ५१२ महिला व पुरुष, तर १ लाख १७हजार ३२० मुला-मुलींनी प्राणिसंग्रहालयाला भेट दिली. कॅमेऱ्यांद्वारे ५३३ वेळा शुल्क आकारले. डिसेंबर २०२५ महिन्यात सर्वाधिक म्हणजे ४२ लाख ९० हजार ३६० रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले. उन्हाळी सुट्या, सणासुदीचे दिवस आणि पर्यटन हंगामात प्राणिसंग्रहालयात पर्यटकांची गर्दी होत आहे.