

Mumbai team for Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation ward formation
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिका प्रशासनाने अगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रच-नेचे काम सुरू केले आहे. परंतु यंदा कामाचे विभाजन न करता आयुक्तांनी संपूर्ण कामकाज स्वतःकडेच ठेवले आहे. एवढेच नव्हे तर गोपनीयसाठी स्थानिक उपायुक्तांसह कर्मचाऱ्यांचीही मदत न घेता मुंबईहून दोघांना बोलविण्यात आल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे.
महापालिकेची निवडणूक प्रथमच प्रभागनिहाय होत आहे. त्यामुळे प्रभाग रचनेकडे सध्या सर्वच इच्छुकांचे लक्ष लागले आहे. प्रभाग रचनेच्या वेळा पत्रकानुसार महापालिकेने कामकाज सुरू केले आहे. ११ जूनपासून हे काम सुरू झाले आहे. ३ ते ६ ऑक्टोबरपर्यंत सूचना व हरकतींची सुनावणी घेऊन अंतिम प्रभाग रचना अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करायची आहे.
प्रशासक मागील अडीच वर्षांपासून शहरात आहेत, त्यांना शहराच्या प्रत्येक वसाहतींसह वॉर्डाची माहिती आहे. त्यामुळे स्थळपाहणीसह आता गुगलशिटनुसार प्रभाग नकाशे तयार करण्यात येणार आहे. हे कामही ठरलेल्या नियोजित वेळेतच पूर्ण केले जाणार आहे.
दरम्यान, आतापर्यंत प्रत्येकवेळी महापालिका निवडणुकीच्या वॉर्ड रच नेचे काम आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली मनपा निवडणूक विभागाचे उपायुक्त करीत होते. परंतु, कोरोना महामारीमुळे मागील ५ वर्षांपासून महापालिकेची निवडणूकच झालेली नाही. त्यामुळे महापालिकेवर प्रशासकराज असल्याने संपूर्ण प्रक्रिया यंदा प्रशासक स्वतःच करीत आहेत. त्यांनी प्रभाग रचनेच्या गोपनियतेवर विशेष लक्ष देत स्थानिक अधिकाऱ्यांना कामकाजापासून दूर ठेवल्याची चर्चा आहे. एवढेच नव्हे तर मदतीसाठी त्यांनी मुंबईहून दोघांची टीम बोलवल्याचेही सांगण्यात येत आहे.
महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने अनेक माजी नगरसेवक वॉडाँमध्ये कामाला लागले आहेत. परंतु या कामासोबतच त्यांचे प्रभाग रचनेच्या कामाकडे विशेष लक्ष आहे. आपला प्रभाग आणि वॉर्ड सेफ झोनमध्ये राहावा, यासाठी अनेक जण प्रशासकांना संपर्क साधून साहेब मला वाचवा, असे साकडे घालत असल्याचीही चर्चा आहे.